आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास सज्ज व्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - "गणेशोत्सवआनंदात साजरा व्हावा, यासाठी प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अावश्यक सर्व प्रकारची पूर्वव्यवस्था करून ठेवावी. नागरिकांच्या आनंदात कोणत्याही प्रकारचे विरजण पडता कामा नये, यासाठी दक्ष असावे असे आदेश देत नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा', असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले.
आगामी गणेशोत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होता कामा नये. अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले. ११ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात महसूल, पोलिस महापालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या वेळी गणेशोत्सव पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. बैठकीला पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, महापालिकेचे आयुक्त अजय लहाने, अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, शैलेश हिंगे, राम लठाड, गजानन निपाणे, अकोला तहसीलदार संतोष शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांच्यासह पोलिस, महसूल महापालिकेच्या विविध िवभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २७ सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांना विविध सोयी-सुविधा, कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, एसडीओ, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, पोलिस प्रशासन यांनी समन्वय ठेवावा. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. त्याप्रमाणे उपाययोजना कराव्यात. या वेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले, गणेश चतुर्थीच्या आधी सर्व रस्त्यांची दुरुस्ती करा. आवश्यक त्या ठिकाणी जास्तीचे पथदिवे लावावेत. जेणेकरून अनुचित प्रकार टाळता येईल. महसूल अधिकाऱ्यांनी तडीपारीचे प्रस्ताव तातडीने तयार करून समाजविघातक व्यक्तींना तातडीने तडीपार करा. गणेशाेत्सवादरम्यान शक्यतो लोडशेडिंग टाळा, अशी सूचनाही जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. या वेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संमती दर्शवली. अंतर्गत रस्त्यातील पथदिवे सुरू आहेत की नाही, याचीही शहानिशा करा, जेणेकरून दुर्घटना टळतील, असे मत या वेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी व्यक्त केले.

घरगुती गणेश विसर्जन करा फायबर टबमध्ये
यावर्षी महापालिका जिल्हा प्रशासनाच्या वतीने पर्यावरणाच्या स्वच्छतेच्या दृष्टीने शहरात जागोजागी गणपती विसर्जनासाठी फायबर टबची व्यवस्था करणार आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने तसेच शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी धार्मिक पावित्र्य जपत घरगुती गणपतीचे विसर्जन फायबर टबमध्ये करा, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी केले.

१५ सप्टेंबरला बैठक
शांततासमितीची बैठक १५ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित केली आहे. बैठकीत शांतता समितीच्या सदस्यांकडून मते जाणून घेऊन योग्यरीत्या नियोजन केले जाणार आहे. शहरातील गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी बैठकीमध्ये विचारमंथन करण्यात येणार आहे. शांतता समितीच्या सदस्यांची मतेही या वेळी जाणून घेण्यात येणार आहेत.

अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे
गणेशोत्सवकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने दक्ष राहावे. प्रत्येक भागात चोख बंदोबस्त ठेवा. शहरासह ग्रामीण भागातील संवेदनशील ठिकाणी पोलिसांची अतिरिक्त कुमक ठेवण्यात येणार आहे. नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास तत्काळ शेजारच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी केले.