आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चैतन्य, उत्साहाच्या वातावरणात विघ्नहर्त्या गणरायाची प्रतिष्ठापना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सर्व धर्मियांच्या भक्तांच्या लाडक्या बाप्पांची पाच सप्टेंबर रोजी घरोघरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये ढोल-ताशांच्या निनादात आणि “गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात उल्हासात प्रतिष्ठापना करण्यात आली. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही डिजेचा आवाज बंद झाला असला तरी पारंपरिक डफडे, दिंडी पथके, ढोल ताशांच्या तालावर तरुणाई थिरकली. गणरायाच्या आगमनामुळे शहरातील वातावरण मंगलमय आणि भक्तिमय झाले.
श्रीगणेश चतुर्थीच्या पर्वावर पहाटेपासून घरोघरी बाप्पांना आणण्याची तयारी सुरू होती. सकाळी सहा ते साडेसात, नऊ ते साडेदहा, दुपारी दीड ते सायंकाळी सव्वासहा या दरम्यान गणपती स्थापनेचा मुहूर्त होता. विविध ठिकाणी सकाळी नऊनंतर गणेश स्थापना सुरू झाली. परंतु, घरोघरीही शक्य होईल त्या वेळेप्रमाणे गणपतीची स्थापना करण्यात आली. अनेक कुटुंबीयांनी एक ते दोन दिवसांपूर्वीच गणपतीची मूर्ती घरी आणून ठेवली होती. तर सोमवारी वाजतापासून सुरू झालेली बाजारातील गर्दीत दहानंतर मोठी वाढ झाली. वाहतुकीत येणाऱ्या अडचणी आणि निर्माण होणारा कचरा लक्षात घेऊन अकोला क्रिकेट क्लब मैदानावर गणेश मूर्ती विक्रीची व्यवस्था करण्यात आली. तसेच शहरातील जयहिंद चौक, जठारपेठ, सिंधी कॅम्प, गोरक्षण मार्ग, कौलखेड, गुलजारपुरा, संत तुकाराम चौक, कौलखेड चौक, डाबकी रोड आदी ठिकाणी लहान तसेच मोठ्या गणेश मूर्तींच्या खरेदीसाठी महिला-पुरुषांसह बच्चेकंपनीने गर्दी केली होती. गणेश मूर्तींच्या बाजारात मूर्तींसोबतच नारळ, गुलाल, कापूर, अगरबत्ती, विड्याची पाने, लाल सुपारी आदी पूजेच्या साहित्याची दुकाने सजली होती. बाजारात येणाऱ्या ग्राहकांना चहा-फराळ उपलब्ध व्हावा म्हणून ठिकठिकाणी दुकाने थाटण्यात आली होती. सर्वाधिक गर्दी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर दिसून आली. त्यासोबतच मोठ्या गणेशमूर्तीसाठी गुलजारपुरा परिसर गजबजला होता. याठिकाणी बाहेरगावावरून आलेले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे ट्रक, ट्रॅक्टर आपापल्या मूर्तीच्या प्रतीक्षेत होते. कायदा सुव्यवस्था चोख राखण्यासाठी पोलिस बंदोबस्तासह वाहतूक पोलिस ठिकठिकाणी तैनात होते. शहरात लहान-मोठ्या अशा गणरायांच्या लाखांवर मूर्तींची पहाटेपासून रात्री बारा वाजेपर्यंत स्थापना झाली.
सजावटीवर भर : दरवर्षीप्रमाणेपारंपारिक गणेशमूर्तींसह अधिकाधिक सजावट केलेल्या मूर्तींना अधिक मागणी दिसून आली. यामध्ये गणपतीचे पितांबर टिकल्यांनी सजवून, मुकुटावर रंगीत काच, रेशमी धागे, जरी आदींच्या सजावटीला नागरिकांनी पसंती दिली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, साईबाबा, तिरुपती बालाजी, मयुरेश्वर, चिंतामणी, श्रीमंत बाजीराव पेशवे, अष्टविनायक, बालकृष्णरुपी गणेश, गायगाव गणेश, जास्वंदाच्या फुलातून साकारलेल्या गणेशमूर्ती, सिद्धी विनायक, लालबागचा राजा, बाहुबली आदी मूर्तींनाही चांगली मागणी होती. याचबरोबर ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मखरही बाजारात आले होते. यामध्ये लहान ते मोठ्या आकाराच्या मखराचा समावेश होता.

शहरात ७०० च्या जवळपास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची नोंदणी झाली आहे. गल्लीबोळातील बाल गणेश मंडळे लक्षात घेतल्यास ही संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पोलिस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे. सार्वजनिक मंडळांनी पूजेच्या गणेश मूर्तीची मुहूर्तावर स्थापना केली. तसेच मुख्य मूर्तीची स्थापना रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

विसर्जनाची व्यवस्था
शहरात काही कुटुंबीयांकडे दीड, तीन आणि पाच दिवसांच्या गणपतीची स्थापना केली जाते. दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन मंगळवारीच होत आहे. या अनुषंगाने महापालिकेने कोतवालीसमोरील गणेश घाटावर एका टाक्याची व्यवस्था केली आहे. तसेच दहाव्या दिवशी होणाऱ्या गणपती विसर्जनासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
बाराभाई गणपतीची स्थापना
शहरातील मानाच्या बाराभाई गणपतीची स्थापना सायंकाळी सातच्या सुमारास करण्यात आली. जुने शहरातील बाराभाई गणपतीची मूर्ती कायम असून तिचे विसर्जन होत नाही. दरवर्षी तिची विधीवत स्थापना होवून दहा दिवस उत्सव चालतो. नाथ कुटुंबीयांच्या निवासस्थानी राजराजेश्वर मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते पूजन करून गणपतीची स्थापना करण्यात आली.

मातीच्या गणेश मूर्तींवर भर
पर्यावरण रक्षणासाठी ईको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन प्रशासनासह सामाजिक संघटनांनी केले. शाडू मातीच्या गणेश मूर्ती निर्मितीच्या कार्यशाळाही पार पडल्या. अनेक शाळांनीही पुढाकार घेतला. त्यामुळे मातीच्या गणेश मूर्तीची मागणी अनेक गणेशभक्तांनी केली. मागणीच्या तुलनेने मातीच्या मूर्ती कमी असल्याने त्यांच्या किमती वधारल्या होत्या.
बातम्या आणखी आहेत...