आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला शहरात दिवाळीमध्ये निघाली स्वच्छतेची लक्तरे, प्रदूषणात झाली वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - दिवाळीमध्ये घराच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले जाते परंतु शहर स्वच्छतेकडे मात्र साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसले. शुक्रवारी शहराच्या विविध भागामध्ये कचऱ्याचे ढिग दिसूून आले. फटाक्यांची त्यात भर पडली. महापालिकेच्या यंत्रणेचे याकडे मुळीच लक्ष नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. रात्री उशीरापर्यंत फटाके फोडण्यात आल्याने शहराच्या प्रदूषणात वाढ झालेली दिसली. धुराचे लोट शहरात दिसत होते. 
 
तहसील ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यानच्या रस्त्यावर किरकोळ विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. त्यांनी निघून जाताना परिसर स्वच्छतेकडे पाठ फिरवली. त्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसत होते. केळीचे खांब पडलेले होते. जिकडेतिकडे कचरा साचलेला होता. मनपाच्या बाजूला असलेल्या बागेला लागून, गांधी चौक परिसर, न्यू क्लॉथ मार्केट परिसर, रतनलालप्लॉट चौक, दुर्गा चौक, तापडियानगर, जठारपेठ, जुनेशहर या भागासह शहरात ठिकठिकाणी कचरा दिसून आला. तो स्वच्छ करण्याकडे सपशेल दुर्लक्ष झाले. 
 
महापालिकेकडे ७४० सफाई कामगार: अकोला महापालिकेकडे ७४० सफाई कामगार आहेत आणि तितकेच कंत्राटी कामगार आहेत. दिवाळीचा बाजार आटोपल्यावर विविध ठिकाणी कचरा होणार हे गृहित धरुन तरी स्वच्छतेला प्राधान्य द्यायला हवे होते परंतु मनपा प्रशासन या बाबत तोकडे पडले. शुक्रवारी सकाळपासून स्वच्छतेची कामे हाती घेतली असती तर शहरभर अस्वच्छता दिसली नसती. मात्र, सफाई विभागाला त्याचे महत्व दिसले नाही. घंटागाड्या फिरून देखील वॉर्डातील कचराकुंड्या भरलेल्या दिसतात. त्यांची वेळीच स्वच्छता केली जात नाही. महापालिकेच्या निष्क्रियतेला लोक कंटाळले आहेत. दररोजची स्वच्छता व्यवस्थित केली जात नाही. त्याचा लोकांना त्रास होत आहे. दररोजच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्याची मागणी लोकांकडून होत आहे. 
 
अस्वच्छतेमुळे डास वाढले : 
शहराच्याविविध भागातील अस्वच्छतेमुळे डासांची संख्या वाढली आहे. सध्या साथजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने गर्मी जाणवत आहे. वातावरणातील बदलामुळे रुग्णालयांमध्ये गर्दी दिसत आहे. गेल्या काही दिवसांत सकाळी थंडी जाणवत आहे. परंतु म्हणावी तशी थंडी अद्यापही नाही. त्याचाही परिणाम दिसतो आहे. 
 
महानगरामध्ये स्वच्छतेचे ऑडिट करण्याची गरज आहे. जलवाहिन्या फुटल्याने त्याचे पाणी पसरते तसेच नाल्यांची स्वच्छता झाल्याने घाण पाणी रस्त्यावर येते याबाबतही सतर्कता दिसत नाही. लोकांच्या आरोग्याशी चाललेला खेळ मनपा यंत्रणेने थांबवावा, अशी मागणी देखील होत आहे. 
 

घंटागाड्यांचे वेळापत्रक बदलले 
डंपिंग ग्राऊंडमध्ये कचरा रिचवण्यासाठी घंटागाड्यांना वाट पाहावी लागत आहे. शहरामध्ये फिरणाऱ्या घंटागाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे. सकाळी येणाऱ्या गाड्या दुपारी केव्हाही येऊ लागल्या आहेत. साचलेला कचरा वाटेल तिथे फेकला जातो. अस्वच्छते त्यामुळे भर पडते आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...