आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजजोडण्या प्रतीक्षा यादी कमी करण्यासाठी शासन कटिबद्ध - पालकमंत्री डॉ. पाटील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्ह्यातील कृषिपंप ग्राहकांना वीजजोडणी देण्यासाठी ७७ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, प्रलंबित वीजजोडणीची प्रतीक्षा यादी कमी करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात महावितरणतर्फे आयोजित आढावा बैठकीत बोलत होते.

बैठकीला आमदार हरीश पिंपळे, आमदार बळीराम सिरस्कार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, आयुक्त अजय लहाने, महावितरणचे अधीक्षक अभियंता यशवंत कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी अखंडित वीजपुरवठा देण्यात यावा, अशी मागणी आमदार पिंपळे यांनी केली, तर शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
अकोला शहर पाणीपुरवठा योजनेच्या वॉटर लिफ्टिंग पंपाच्या एक्स्प्रेस फीडरसाठी कमी दाबाचा वीजपुरवठा झाल्याने मध्यंतरी मोटारपंप जळण्याची तक्रार महापौर उज्ज्वला देशमुख यांनी केली. एक्स्प्रेस फीडरसाठी याेग्य दाबाचा वीजपुरवठा नेहमीसाठी करण्यात यावा, तसेच विजेचा झटका लागून मृत्यू होण्याच्या घटनेत वाढ होत असून, ठोस उपाययोजना तातडीने कराव्यात, अशा सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी केल्या. जिल्ह्यात ट्रान्सफार्मर नादुरुस्त होण्याचे प्रमाण लक्षात घेता प्रत्येक तालुक्यात ट्रान्सफार्मर दुरुस्तीसाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करून व्यवस्था व्हावी, असे निर्देश त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेत.
अकोला जिल्ह्यामध्ये मार्च २०१५ पर्यंत कृषिपंप वीलजोडणीसाठी प्रतीक्षा यादीमध्ये सात हजार ६२१ शेतकरी अर्जदार असून, त्यापैकी २०१५-१६ वर्षामध्ये १९८० ग्राहकांना कृषिपंपासाठी वीजजोडणी देण्यात आल्याची माहिती अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता यशवंत कांबळे यांनी दिली. अकोला जिल्ह्याचे इन्फ्रा ७, दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, तसेच आय.पी.डी.एस. योजनेंतर्गत भरण्यात आलेला मंजूर निधी तसेच प्रत्यक्षात झालेल्या कामाचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. या वेळी जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समितीचे अशासकीय सदस्य मनोज तायडे, विनोद जायले, अमोल येवले, चंद्रकांत तिवारी, निशिकांत कुलकर्णी, सचिन पाटील उपस्थित होते. तसेच महावितरण ग्रामीणचे कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकर, कार्यकारी अभियंता डामरे, महाजेनकोचे मुख्य अभियंता प्रफुल्ल अबघड, कार्यकारी अभियंता गणेश देशमुख, राहुल पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
जिल्ह्यातट्रान्सफार्मर नादुरुस्त होण्याचे प्रमाण लक्षात घेता प्रत्येक तालुक्यात ट्रान्सफार्मर दुरुस्तीसाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करून व्यवस्था व्हावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेत. ठोस उपाययोजना तातडीने कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
बातम्या आणखी आहेत...