आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीला नाकारत तो रमला फळ शेतीमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - एमबीए नंतर दरमहा ४५ हजारांच्या नोकरीला ठोकर मारून २७ वर्षीय युवकाने शेतीत झोकून देऊन लाखो रुपयांचे उत्पन्न घेत समाजापुढे आदर्श निर्माण केला. शेती व्यवसाय डबघाईस आला. कोरडवाहू शेती करणारा शेतकरी म्हणजे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला अशी शंका येते, ती बऱ्याच अंशी खरी ठरण्यासारखी परिस्थिती उद्भवल्याचे चित्र आहे. या दुर्दैवी वस्तुस्थितीमुळेच सध्याच्या काळातील तरुण शेतीकडे वळत नाही. हा युवावर्ग नोकरीच्या मागे लागला आहे. घरी शेती असूनही काही युवक पुणे, मुंबईसारख्या शहरात जाऊन पडेल ती कामे करत आहेत. मात्र, येथील ब्रह्मकुमार मंगळराज पांडे या युवकाने या मार्गाने जाण्याचे टाळून शेतीच्या खडतर वाटेवर चालण्याचा निर्णय घेतला. कृषीत एमबीए केल्यानंतर ब्रह्मकुमारने एक वर्ष एका खासगी कंपनीत नोकरी केली. पगारही दर महिन्याला ४५ हजार मिळत होता. मात्र, तो या नोकरीला ठोकर मारून शेती व्यवसायाकडे वळला आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो यशस्वीरीत्या शेती करत असून, नियोजनबद्ध काम केल्यास शेतीमधून भरघोस उत्पादन घेता येते, हे त्याने सिद्ध करून दाखवले आहे. शेतीवर टीका करून त्यापासून दूर पळण्यापेक्षा आधुनिक पद्धतीने शेती करून उत्पन्न मिळवता येते, हे त्याने कृतीतून सत्यात उतरवले आहे.
अकाेट तालुक्यातील खारपाणपट्ट्यात डाळींबाची शेती फुलवली आहे.

शास्त्रीय शेती केल्यास यश
पारंपरिक शेती करण्यापेक्षा शास्त्रशुद्ध शेती केल्यास यश मिळते. माती तपासून योग्य खते वापरावी. कीडनाशकेही मर्यादित, परंतु परिणामकारक वापरावी. पाण्याचे व्यवस्थापन करावे.कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. ब्रह्मकुमार पांडे, युवा शेतकरी, अकोट
खारपाण पट्ट्यात फळबाग : ब्रह्मकुमारपांडेची शेती अकोटजवळील ढगा फाटा या खारपाणपट्ट्यात आहे. येथील शेती निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. याच शेतात त्याने डाळिंब लिंबाची बाग फुलवली आहे.