आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीएचे स्वप्न अधुरे; मृत्यूनंतर नेत्रदान, २१ वर्षीय माधवीचा हृदयविकाराने वर्गातच मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - एका दुर्धर आजारावर मात करून चार्टर्ड अकाउंटंट होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीचा शिकवणी वर्गातच मृत्यू झाला. मनमिळाऊ स्वभावाच्या माधवी कांबळे हिच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मुलीच्या निधनाने दु:खाचा डाेंगर काेसळलेला असतानाही तिच्या कुटुंबीयांनी माधवीचे मरणाेत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेऊन एक वेगळा पायंडा पाडल्याची भावनाही निर्माण झाली आहे.

काँग्रेसनगरच्या तथागतनगरमध्ये कांबळे कुटुंबीय राहतात. त्यांची माधवी ही मुलगी शहरातील एलआरटी काॅलेजमध्ये एम.काॅम.च्या प्रथम वर्षाला होती. एका खासगी शिकवणी वर्गात ती ‘सीए’ची तयारी करत होती. नेहमीप्रमाणे सकाळी ११ वाजता ती शिकवणी वर्गात असतानाच अचानक कोसळली. लगोलग तिला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

आई व भावंडांसह मामाकडे राहत होती
माधवीच्या वडिलांचे तीन वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले. धाकटा भाऊ, बहीण व आईसह ती मामासोबत राहत होती. लहानपणापासूनच माधवीला हृदयाचा आजार होता. त्यावर उपचार सुरू होते. अलीकडे प्रकृतीची फारशी तक्रार नव्हती. त्यामुळे आजाराला विसरून माधवीने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले होते.

नातलगांचा प्रस्ताव, कुटुंबीयांचा होकार
कांबळे कुटुंबीयांचे काही नातेवाईक व निशिकांत बडगे यांनी माधवीच्या नेत्रदानाचा प्रस्ताव ठेवला. माधवीच्या डोळ्यांनी कुणीतरी जग पाहू शकेल या भावनेतून तिच्या कुटुंबीयांनी होकार दिला. पाठोपाठ माधवीचे नेत्रदान करण्यात आले. शोकाकुल वातावरणात नंतर तिच्यावर अंत्यसंस्कार झाले.
बातम्या आणखी आहेत...