आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम विदर्भातील ऐतिहासिक वास्तूंच्या सीमा गेल्या चोरीला!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- भारतीय पुरातत्व विभागाने (एएसआय) राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केलेल्या बहुतेक ऐतिहासिक वास्तुंच्या सीमा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने चोरीला गेल्या आहेत. सदर वास्तूंना त्यातून मुक्त करण्यासाठी ‘एएसआय’ने मोजणीचा विडा उचलला असून, पश्चिम विदर्भातील सर्व वास्तूंचे सीमांकन लवकरच केले जाणार आहे. 

पश्चिम विदर्भातील अमरावती अकोला जिल्ह्यात आठ राष्ट्रीय वारसास्थळे आहेत. अमरावती जिल्ह्यात तीन आणि अकोल्यात पाच अशी त्यांची विभागणी आहे. या सर्व वास्तूंचे सीमांकन करण्यासाठी त्यांची मोजणी करण्याचा निर्णय आर्क्यालॉजीकल सर्व्हे ऑफ इंडियाने (एएसआय) घेतला आहे. 

अकोला जिल्ह्यात अकोला शहराचा असदगड किल्ला, बेसाल्ट दगडाने बांधलेले बार्शिटाकळी येथील भवानी मंदिर, बाळापुरचा किल्ला राजे जयसिंह यांची छत्री आणि अकोट तालुक्यातील नरनाळा किल्ला अशा पाच राष्ट्रीय वास्तू आहेत. याशिवाय अमरावती जिल्ह्यात अचलपूरचा हौज कटोरा (तलावाच्या मधोमध असलेला हमामखाना) नबाब इस्माईल खान किल्ला आणि दर्यापूर तालुक्यातील लासूर येथील आनंदेश्वर मंदिर या तीन ऐतिहासिक वास्तू आहेत. या सर्व वास्तूंच्या देखरेख दुरुस्तीची जबाबदारी एएसआयची असून ती अकोला येथून नियंत्रित केली जाते. 

या वास्तू चिरकाल टिकाव्यात आणि त्यांची देखरेख योग्य पद्धतीने व्हावी यासाठी एएसआयतर्फे या सर्व वास्तूंची तटबंदी केली जाणार आहे. म्हणूनच प्रत्येक वास्तूच्या मोजणीची प्रक्रिया हातात घेण्यात आली असून टप्प्याटप्प्याने हे काम पूर्ण केले जाणार आहे. दरम्यान अचलपूर येथे दोन प्रमुख राष्ट्रीय वास्तू असल्या तरी एलीचपुरची खिडकी आणि जीवनपुरा, हीरापुरा दुल्हागेट येथील परकोट या पुरक वास्तूही आहेत. 

बाळापूर किल्ल्याची मोजणी पूर्ण 
विभागातील राष्ट्रीय वास्तूंच्या मोजणीचा प्रारंभ बाळापूरच्या किनल्ल्यापासून केला. आता दुसऱ्या टप्प्यात अकोल्याच्या असदगड किल्ल्याचे मोजमाप होईल. टप्प्याटप्प्याने इतर वास्तूंचेही सीमांकन हेाईल. दोन्ही किल्ल्यांच्या मोजणीचे शुल्क भूमी अभिलेख कार्यालयात यापूर्वीच जमा केले आहे. 

अकोल्यातच पश्चिम विदर्भाचे कार्यालय 
अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय वारसास्थळांची (वास्तूंची) संख्या जास्त असल्याने केंद्र शासनाने त्यासाठीचे कार्यालयही (एएसआय) अकोल्यातच उघडले. जिल्हाधिकारी कार्यालय, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयास लागून एएसआयचा कक्ष आहे. याच ठिकाणाहून दोन्ही जिल्ह्यातील वास्तूंच्या देखरेख दुरुस्तीसह संरक्षणाचे कार्य होते. 
बातम्या आणखी आहेत...