तेल्हारा - कायदा व्यवस्था सांभाळण्याची ४८ गावांची जबाबदारी असलेल्या हिवरखेड पोलिस स्टेशनचे बंदीगृहच आठ वर्षांपासून बंदावस्थेत असल्याने पोलिस कोठडी मिळालेल्या आरोपींना तेल्हारा, अकोट येथील पोलिस स्टेशनच्या बंदीगृहात ठेवावे लागत आहे. तपास अधिकाऱ्यांनाही या ठिकाणी जाऊन तपास करावा लागतो. त्यामुळे अनेक गुन्ह्यांतील तपास प्रभावीपणे होत नसल्याचे दिसून येते.
तालुक्यात तेल्हारा हिवरखेड हे दोन पोलिस स्टेशन आहेत. तेल्हारा पोलिस स्टेशन अंतर्गत ५६ गावे, तर हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत ४८ गावे येतात. हिवरखेड पोलिस अंतर्गत हिवरखेड, अडगाव, सिरसोली, बेलखेड, दानापूर, खंडाळा ही गावे अति संवेदनशील म्हणून गणली जातात. शिवाय हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. गत काही दिवसांपूर्वी या पोलिस स्टेशन अंतर्गत तीन हत्येच्या घटना घडल्या, तर तळेगाव बाजार येथून जवळच असलेल्या मालपुरा येथे बहुचर्चित चौहेरी हत्याकांड घडले आहे. अशा घटना घडत असताना आरोपींना अटक केली असता त्यांना तेल्हारा किंवा अकोट येथील बंदीगृहात ठेवावे लागते.
हिवरखेड पोलिस स्टेशनचे बंदीगृह बंद असल्याने पोलिस कोठडी मिळालेल्या आरोपींना इतरत्र पोलिस स्टेशनच्या बंदीगृहात न्यावे लागते. संबंधित गुन्ह्याच्या तपास अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जाऊन तपास करावा लागतो. त्यामुळे अधिकाऱ्यांना हेलपाटे तर होतातच, शिवाय तपासदेखील प्रभावित होत आहे. त्यामुळे या पोलिस स्टेशनचे बंद असलेले बंदीगृह सुरू करण्याची मागणी होत आहे.
बंदीगृह सुरू झाल्यास सोयीचे होईल
^पोलिस स्टेशनमधील बंदीगृह बंद असल्यामुळे अटक केलेल्या आरोपींना इतरत्र हलवावे लागते. बंदीगृह सुरू झाल्यास सोयीचे होईल.'' मालसिंग चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक, हिवरखेड.