आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: भुकेलेल्यांना दोन घास देणारी 'रोटी बँक'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: रोटी बँकेची माहिती देताना सिंधू युवा मंचचे पदाधिकारी.
अकोला - अन्नदान हेच श्रेष्ठदान असल्याची भावना मनात ठेवून अखिल भारतीय सिंधू सभा युवा मंचाच्या युवकांनी एकत्र येऊन शहरात रोटी बँकेची मुहूर्तमेढ रोवली आहे. प्रत्येकाच्या घरून किमान एका व्यक्तीचे पोट भरेल एवढे अन्न गोळा करून ते भुकेलेल्यांना देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. आता या उपक्रमात शेकडो युवकांनी सहभाग नोंदवला आहे. या उपक्रमाला आता रोटी बँक हे नाव देण्यात आले आहे.

दररोज शहरातील शेकडो भुकेलेल्यांना रोटी बँकेच्या माध्यमातून अन्नदान करण्यात येत आहे. या उपक्रमाबाबत सिंधू सभा युवा मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवार, १२ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत माहिती दिली. सर्वसामान्यांना पोटभर अन्न मिळते. मात्र, आपल्या अवतीभवती असणाऱ्या अनेकांना दोन वेळचे अन्न मिळत नाही. त्यामुळे त्यांना आपण दररोज जेवण द्यावे, या भावनेतून सिंधी कॅम्प परिसरातील युवक अखिल भारतीय सिंधू सभा युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष संतोष बजाज यांच्या नेतृत्वात एकत्र आले. सुरुवातीला सिंधू युवा मंचाचे राजेश चावला, आशिष राजपाल, मनीष रामाणी, मनीष लुल्ला, नितीन राजपाल, विकी राजपाल, पंकज आहुजा, रोशन वाधवाणी, अजय रोचलानी, शिवा खापरकर, समीर ठाकूर या युवकांनी आपापल्या घरून पोळी आणि भाजी गोळा केली. शहरातील विविध भागातील भुकेलेल्या व्यक्तींना या माध्यमातून त्यांनी अन्नदान सुरू केले. या उपक्रमात आता शेकडो युवक सहभागी झाले आहेत. त्यामुळे आता या उपक्रमाचा विस्तार करत त्याला रोटी बँक असे नाव दिले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

पत्रकार परिषदेस अखिल भारतीय सिंधू महासभेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष लध्धाराम नागवानी, महाराष्ट्र महामंत्री घनश्याम कुकरेजा, सिंधू महासभेचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, सिंधू युवा मंचाचे प्रदेशाध्यक्ष संजय वाधवाणी, प्रदेश महामंत्री संजय हेराणी, खंदुर येथील शंकरलाल मानकानी, अकोला जिल्हाध्यक्ष हरीश आलिमचंदानी, युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष संतोष बजाज यांची उपस्थिती होती.

सिंधी कॅम्पमध्ये स्थायी काउंटर

सिंधी कॅम्प परिसरात रोटी बँकेचे स्थायी काउंटर निर्माण करण्यात येणार आहे. या काउंटरवर २४ तास कोणत्याही गरजू व्यक्तीला ताजे अन्न उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लवकरच शहरातील अन्न गोळा करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात येणार असून, खामगाव येथील युवा मंचाची शाखाही हा उपक्रम सुरू करणार आहे. जिल्ह्यातील सर्व सेवाभावींनी उपक्रमासाठी सहकार्य करावे, असे अावाहन संतोष बजाज यांनी केले आहे.

असे जमते अन्न
मंचातीलप्रत्येक सदस्याच्या घरून दोन व्यक्तींचे जेवण हे युवक एकत्र करतात. त्यानंतर ते शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवले जाते. तसेच शहरामध्ये कुठेही लग्नसोहळा किंवा इतर कार्यक्रम असल्यास त्यावर युवक लक्ष ठेवून असतात. तिथे उरलेले अन्न आणून ते गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात.