आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Husband And Wife Died After Fall Down In Well For Water At Yavatmal

पाणी टंचाईने घेतला पती-पत्नीचा बळी, चार वर्षांचा बजरंग, तीन वर्षांचा प्रीतम पोरका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर्णी (जि. यवतमाळ) - यवतमाळ जिल्ह्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस भीषण स्वरूप धारण करत आहे. आर्णी पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या वडगाव (तांडा) येथे पाणीटंचाईने पती-पत्नीचा बळी घेतल्याची खळबळजनक घटना रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. माणिक प्रेमसिंग जाधव (वय ३० ) व मेनका माणिक जाधव (वय २६), असे विहिरीत पडून मृत्यृ झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत.
वडगाव (गाडवे) आणि वडगाव(तांडा) हे गट ग्रामपंचायत असून, मागील एक महिन्यापासून गावात भीषण पाणीटंचाईचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. गावामध्ये तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा होतो. यामुळे येथील माणिक जाधव हे पत्नी मेनकासोबत गावानजीकच्या जगदीश कनिराम राठोड यांच्या शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेले होते. विहिरीतील पाणी काढत असताना मेनकाचा तोल गेल्याने ती विहिरीत पडली. तिला वाचवण्यासाठी पती माणिक याने लगेच विहिरीत उडी मारली. मात्र, यात दोघेही मृत्युमुखी पडले. गावात लग्नकार्य सुरू असल्याने गावातील सर्व लोक त्या ठिकाणी जमले होते. घरी पाणी आणण्यासाठी सांगून गेलेली मृतक मेनका आणि माणिक हे उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांना पाहण्यासाठी लहान सून विहिरीवर गेली असता त्या ठिकाणी खाली अवस्थेत पडलेले गुंड दिसून आल्याने तिने त्वरित याची माहिती आपल्या सासू-सासऱ्यांना दिली. मृतकाचे वडील प्रेमसिंग हे गावातील काही नागरिकांना सोबत घेऊन गावानजीक असलेल्या विहिरीवर गेले असता त्या विहिरीत दोघेही मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले
बजरंग आणि प्रीतम झाले पोरके
माणिक व मेनका यांना एक सात वर्षांची मोठी मुलगी असून, चार वर्षांचा बजरंग आणि तीन वर्षांचा प्रीतम ही मुले आहेत. पाणीटंचाईने पती-पत्नीचा बळी गेल्याने गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्या तीन लहान मुलांचे कोण पालनपोषण करणार, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. वडगाव (तांडा) येथे एवढी मोठी दुःखद घटना घडल्यानंतरही एकाही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावाला भेट दिली नाही. ज्या विहिरीत ही घटना घडली त्या विहिरीत बारा ते पंधरा फूट पाणी असून, विहिरीत मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने माणिकला पत्नी मेनका आणि स्वत:ला वाचवता आले नसावे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, गावाविषयी माहिती...