आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी पाऊस झाल्यास पुराचा धोका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- दोनदिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीने अडीच मीटरची पातळी गाठली आहे. यापुढे अधिक पाऊस झाल्यास आणि मोर्णा नदीने साडेतीन मीटरची पातळी गाठल्यास शहराला पुराचा धोका कायम आहे. शहराचा पुरापासून बचाव करण्यासाठी पूर संरक्षक योजना बंद करून त्याऐवजी चार धरणे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, निम्न मोर्णा प्रकल्पाचे काम अद्यापही रखडलेले आहे. त्यामुळे शहराला पुराचा धोका अद्यापही कायम आहे.
शहरातून मोर्णा नदी वाहते. मोर्णा नदीला विद्रूपा नदी मिळते. मोर्णा नदीवर पातूर येथे मोर्णा प्रकल्प बांधण्यात आला आहे. परंतु, त्यानंतर या चारमाही नदीवर कोणताही प्रकल्प नव्हता. मोर्णा नदीला शहराच्या पूर्वीच २९ नाले येऊन मिळतात. तसेच शहरातील नालेही नदीला येऊन मिळतात, त्यामुळेे मोर्णा नदीला सतत पूर येतो. शहराचे पुरापासून संरक्षण करण्यासाठीच १५ वर्षांपूर्वी पूर संरक्षक योजना आखण्यात आली. शहरातून वाहणाऱ्या नदीच्या दोन्ही भागाला भिंत बांधण्याची ही योजना होती. परंतु, भिंत बांधताना येणाऱ्या अडचणी आणि खर्च लक्षात घेऊन या योजनेऐवजी मोर्णा, विद्रूपा नदीवर तीन धरणे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या तीन धरणांपैकी दोन धरणांचे काम पूर्ण झालेले आहे..

मोर्णा नदीवर मोर्णा प्रकल्पाच्या वर मेडशीजवळ उर्ध्व मोर्णा, पातूरजवळ निम्न मोर्णा, विद्रूपा नदीवर दगडपारवा प्रकल्पाच्या कामाला शासनाने मंजुरी दिली. या तिन्ही प्रकल्पांमुळे ५८.१० दशलक्ष घनमीटर पाणी शहरात येण्यापूर्वीच रोखता येणार होते. विशेष म्हणजे हे तिन्ही प्रकल्प शहराचे पुरापासून संरक्षण करण्यासाठीच मंजूर करण्यात आले होते. त्यामुळे पावसाळ्यानंतर या प्रकल्पातील काही टक्के पाणी पावसाचे पाणी म्हणून टप्प्याटप्प्याने नदीत सोडले जाणार होते. या तीन प्रकल्पांपैकी उर्ध्व मोर्णा, दगडपारवा या दोन्ही प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे.

२९ नाले मोर्णा नदीला शहराच्या पूर्वीच येऊन मिळतात.
मोर्णा नदीने साडेतीन मीटरपेक्षा अधिक उंची गाठली तर शहराला पुराचा धोका कायम आहे. दोन दिवसांतील संततधार पावसामुळे मोर्णा नदीने अडीच मीटरची पातळी गाठली आहे. जर पाऊस असाच सुरू राहिल्यास साडेतीन मीटरची उंची गाठण्यास मोर्णा नदीला वेळ लागणार नाही. त्यामुळेच शहराला पुराचा धोका कायम आहे.

शहरातील अनेक भागांत मंगळवारी अाणि बुधवारी झालेल्या पावसामुळे घरात पाणी शिरले हाेते.
निम्न मोर्णा प्रकल्प आवश्यक का?

महापालिकेचीहद्दवाढ झाल्यास २१ गावांचा समावेश महापालिकेत होणार आहे. तसेच वाढणारी लोकसंख्या, भविष्यातील पाणीटंचाई आणि नियमानुसार दरडोई पाणीपुरवठा केल्यास महापालिकेला आठ ते दहा दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज भासणार आहे. काटेपूर्णा प्रकल्पात शहरासाठी २४ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे. मोर्णा प्रकल्पातील आरक्षण रद्द झाले आहे. या प्रकल्पाचे काम मार्गी लागल्यास एकीकडे शहराचे पुरापासून संरक्षण तर दुसरीकडे शहराची पाणी समस्या निकाली काढण्यासही हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.

या दोन्ही प्रकल्पांत साठवलेले पाणी पावसाळ्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रत्येकी ७.१६ ११.४१ दलघमी पावसाचे पाणी म्हणून नदीत सोडले जाते. परंतु, निम्न मोर्णा प्रकल्पाचे काम सुरूच झाले नाही. मोर्णा प्रकल्प ते अकोला शहर नदीच्या ३५ किलोमीटरदरम्यान नदीला नाल्यांचे मिळणारे पाणी अडवल्या जात नाही. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यास २१.०९ दशलक्ष घनमीटर पाणी अडवले जाणार आहे.

लोकप्रतिनिधींचे होतेय दुर्लक्ष
निम्नमोर्णा प्रकल्पाचे काम १५ वर्षांपासून रखडले आहे. या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम रखडले आहे. परंतु, मागील १५ वर्षांत लोकप्रतिनिधींनी संबंधित शेतकऱ्यांशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधलेला नाही. संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, मागण्या समजून घेण्यात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी रस घेतला नाही.
23.48
13.59
साठवण क्षमता
बातम्या आणखी आहेत...