आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महिने धीर धरा, अन्यथा पूर्ण इमारतच पाडली जाईल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सर्वनियम धाब्यावर बसवून बांधकाम झाल्याने अशा बांधकामांवर बुलडोझर चालवला जात आहे. परंतु, आता सुदैवाने बांधकाम विकास नियंत्रण नियमावली मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे दोन महिने धीर धरा, बांधकाम करू नका. या आवाहनाला प्रतिसाद देता बांधकाम सुरू ठेवल्यास आता पिल्लर नाही तर पूर्ण इमारत पाडली जाईल, असा इशारा आयुक्त अजय लहाने यांनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीवर स्वाक्षरी केल्याने आता ही नियमावली पाइपलाइनमध्ये आली आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत नवीन नियमावलीनुसार बांधकाम केले जाणार आहे. या अनुषंगाने आयुक्त अजय लहाने यांनी अवैध बांधकामप्रकरणी नोटीस बजावलेल्या १८६ इमारतधारकांच्या १८ नोव्हेंबरला महापालिकेच्या मुख्य सभागृहात घेतलेल्या बैठकीत त्यांनी हा इशारा दिला. आयुक्त अजय लहाने म्हणाले, नव्या बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीत नेमका किती एफएसआय वाढेल, याबाबत आत्ताच निश्चित सांगता येत नसले तरी टीडीआर, प्रीमियम आदींच्या माध्यमातून एफएसआय वाढवून मिळेल, ही बाब निश्चित आहे. त्यामुळे दोन महिने धीर धरा, त्यानंतर नेमका किती एफएसआय वाढवून मिळतो, ते पाहून नकाशा रिवाइज करून नियमानुसार जेवढे बांधकाम वैध करता येईल, तेवढे करता येईल. परिणामी, काही प्रमाणात बांधकाम पाडले जाईल. परंतु, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. सर्व नियम धाब्यावर बसवून आपण बांधकाम केले आहे. पार्किंगचाही विचार केलेला नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन सहकार्य करा. डीसी रुलला अंतिम मंजुरी मिळेपर्यंत बांधकाम करू नका, जे या आवाहनाला प्रतिसाद देता, बांधकाम सुरू ठेवतील, त्यांचे पूर्ण बांधकाम उद्ध्वस्त केले जाईल, ही बाब लक्षात घ्या, असा सज्जड दमही आयुक्तांनी दिला.

पाडण्याचेही नियोजन करा : ज्याप्रमाणेअवैध बांधकामाचे नियोजन केले, त्याच प्रमाणे डीसी रुल मंजूर झाल्यानंतर जे बांधकाम अवैध ठरेल, ते अ‌वैध बांधकाम पाडण्याचे नियोजनही तुम्हीच करा, असा सल्लाही आयुक्तांनी बिल्डर्सला दिला.

तुम्ही म्हणत असाल, ‘अब क्या सोचेंगे’
आयुक्तांनी सर्व बाबी स्पष्ट केल्या. कोणता बिल्डर्स भोगवटा प्रमाणपत्र देऊ शकतो? त्यांनी हात वर करावा, असे विविध प्रश्न उपस्थित करून आयुक्तांनी बिल्डर्सला भंडावून सोडले. तुमच्यापैकी कोणीही बोलायला तयार नाही, याचा अर्थ मी जे बोललो ते खरे आहे. त्यामुळे तुम्ही म्हणत असाल, अब क्या सोचेंगे?

दादागिरी करू नका
प्रशासनाने अ‌वैध बांधकामप्रकरणी नोटीस बजावल्यानंतर अनेकांनी बांधकाम थांबवले नाही. याचाच अर्थ आपल्याला कायद्याची भीती नाही, हे स्पष्ट होते. नोटीस दिली मग काय होणार? या भ्रमात राहून दादागिरी करत बांधकाम सुरू ठेवले, त्याचा फटका तुम्हाला बसला. तयार केलेले नियम, कायदे हे सर्व नागरिकांसाठी आहेत. त्याची पायमल्ली होता कामा नये.

पार्किंगच्या जागा केल्या हडप : नकाशामंजूर करताना तळघरात पार्किंग मंजूर असताना, अनेकांनी पार्किंगच्या जागी दुकाने बांधली. ज्यांनी पार्किंगच्या जागेत बांधकाम केले आहे, ते सर्व पाडण्यात येईल.

^बांधकाम धारकांनी मंजूर नकाशापेक्षा अधिक बांधकाम केले आहे. इतर मनपाच्या धर्तीवर हार्डशिप कम्पाउंंडिंग फी प्रस्ताव मंजूर करून दंड आकारून जेवढे बांधकाम वैध होईल, तेवढे करून द्यावे.'' - संतोषमोहता, बांधकाम व्यावसायिक

भ्रमात राहू नका
टीडीआरचा फायदा घेऊन बांधकाम वैध होईल, अशा भ्रमात राहू नका. कारण टीडीआरची प्रक्रिया किचकट आहे. ही बाब समजून घ्या. तुमच्यामुळे सर्वसामान्यांची फसवणूक होते, हेही लक्षात घ्या, असा सल्लाही या वेळी आयुक्तांनी उपस्थितांना दिला. या वेळी अवैध बांधकामासंदर्भात विविध विषयांवर चर्चा केली.

सर्व बिल्डर्स उपस्थित
अवैध बांधकामाबाबत आयुक्त नेमका कोणता निर्णय घेतात? याकडे बिल्डर्समध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामुळे या बैठकीला १८६ जणांना बोलावण्यात आले होते. परंतु, या बैठकीला १८६ जणांसोबत ज्या-ज्या व्यक्तींचे बांधकाम सुरू आहे, त्यांच्यासह झाडून-पुसून सर्व बिल्डर्स उपस्थित होते.