आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपातील अनेक महत्त्वाची पदे रिक्त, हद्दवाढीनंतर वाढणार कामाचा ताण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेत एक उपायुक्तांसह १८ पेक्षा अधिक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने महापालिकेच्या कामकाजावर आत्ताच परिणाम होत आहे. आता हद्दवाढ झाल्याने कामाचा ताण वाढणार असून, नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील सर्व समस्या हाताळताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे हद्दवाढीच्या निर्णयानंतर आता शासनाला महापालिकेतील सर्व महत्त्वाची रिक्तपदे भरावी लागणार आहेत. २००१ ला महापालिका अस्तित्वात आल्याने आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांसह विविध पदे निर्माण झाली. प्रारंभीच्या काळात आयुक्त, दोन उपायुक्त, सहायक आयुक्त, शहर अभियंता अशा सर्व पदांवर अधिकारी होते. त्यामुळे कामकाजही सुरळीत सुरू होते. परंतु, पुढे महापालिकेतील राजकारणाला कंटाळून अधिकारी वैतागून बदली करून गेले. महापालिकेतील हे चित्र अद्यापही बदललेले नाही. त्यामुळे महापालिका अस्तित्वात येऊन १५ वर्षांचा कार्यकाळ झाला असताना तसेच आता महापालिकेचे क्षेत्रफळ २८ वरून १२४ चौरस किलोमीटर झाले असतानाही अद्यापही १८ पेक्षा अधिक अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होणार असून, पर्यायाने कामकाजही ढेपाळणार आहे, तर पदे रिक्त असल्याने एकाच अधिकाऱ्याकडे विविध विभागाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्याने अधिकाऱ्यांवरील ताण वाढला आहे. तसेच अधिकाऱ्यांना कोणत्याही एका कामाकडे लक्ष केंद्रीत करता येत नाही. या सर्व प्रकारामुळे कर भरणारा सर्वसामान्य नागरिक मात्र नाहक वेठीस धरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उपायुक्तांसहसहायक आयुक्तांची पदे रिक्त : महापालिकेतउपायुक्तांची दोन, तर सहायक आयुक्तांची चार पदे मंजूर आहेत. यापैकी एक उपायुक्त एक सहायक आयुक्त पद रिक्त आहे. एका उपायुक्तांचे पद तीन वर्षांपासून रिक्त आहे. याच बरोबर कर निर्धारण अधिकारी पदासारखी महत्त्वाची पदे रिक्त आहेत.

आस्थापना खर्च महत्त्वाचे कारण : हीमहत्त्वाची रिक्तपदे भरताना आस्थापना खर्च अधिक हे कारण पुढे केले जाते. परंतु, अधिकाऱ्यांची महत्त्वाची रिक्त पदे भरल्याशिवाय महसुलात वाढ होणार नाही. त्याच बरोबर उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांकडे लक्ष दिल्यास उत्पन्नात वाढ होऊ शकते. महसुलात वाढ झाली की आस्थापना खर्चही कमी होऊ शकतो.

क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या वाढणार : महापालिकेचेक्षेत्रफळ १२४ चौरस किलोमीटर झाल्याने महापालिकेला क्षेत्रिय कार्यालये परिपूर्ण करावी लागणार आहेत. सक्षम क्षेत्रिय अधिकाऱ्यांसोबतच कर्मचाऱ्यांचा फौजफाटा क्षेत्रिय कार्यालयात उपलब्ध करून दिल्यासच महापालिकेच्या मुख्य कार्यालयावरील ताण कमी होऊ शकतो, असे मत निवृत्त अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
असा होतो परिणाम
आयुक्तांच्या हाताखाली दोन उपायुक्त उपायुक्तांच्या हाताखाली चार सहायक आयुक्त तसेच सक्षम क्षेत्रिय अधिकारी असल्यास कामाची विभागणी केली जाते. आयुक्तांना प्रत्येक कामावर लक्ष ठेवता येते. अधिकाऱ्यांना विभाग बरोबरीने वाटून दिल्यामुळे कामकाज योग्य प्रकारे होते. याच बरोबर नगररचना विभागातील पदे रिक्त असल्याने उपलब्ध दोन कनिष्ठ अभियंत्यांनाच मालमत्तांचे मोजमाप, नकाशा मंजूर करणे, अतिक्रमण, लेआऊट, सुरू असलेले बांधकाम पाहणे आदी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. एकाच वेळी एक अथवा दोन अधिकारी याकडे लक्ष देऊ शकत नसल्याने यातून अवैध बांधकामे उदयाला येतात.
बातम्या आणखी आहेत...