आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकांचे लैंगिक शोषण रोखण्यास युवकांनी पुढे यावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बालकामगार कायद्याने गुन्हा असला तरी आजही अनेक ठिकाणी लहान बालके काम करताना दिसतात. कामाच्या ठिकाणी बालकांवर होणाऱ्या इतर अत्याचारांमध्ये लैंगिक शोषणाचे प्रमाण वाढत आहे. याशिवाय समाजात अनेक ठिकाणी बालकांवर होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या समस्या समोर येत आहेत. याविषयी समाजात जनजागृती होणे गरजेचे आहे. बालकांच्या हक्कासाठी, त्यांच्यावर होणारे अत्याचार रोखण्यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन जागृती घडवणे आवश्यक अाहे, असे मत जिल्हा बाल संरक्षण कक्षातील संरक्षण अधिकारी प्रशांत घुलक्षे यांनी व्यक्त केले.

ऑगस्ट रोजी आयोजित बाल हक्क बाल लैंगिक शोषण, या विषयावर जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा बाल संरक्षण कक्ष, शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि गृहविज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक हे शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांपर्यंत तसेच विविध उपक्रमांतून समाजापर्यंत पोहोचतात. त्यासाठी आधी युवकांनी जागरूक होणे आवश्यक आहे. या उद्देशाने रासेयो स्वयंसेवकांसाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. संरक्षण अधिकारी प्रशांत घुलक्षे यांनी बाल हक्क कायद्याविषयी तसेच बालकांचे लैंगिक शोषण याविषयी माहिती दिली. सध्या समाजात बालकांचे लैंगिक शोषण होते, याविषयी अपेक्षित तशी जागृती झाली नाही. त्यामुळे अत्याचाराविरोधात आवाज उठवल्या जात नाही. त्यासाठी समाजात माहिती पोहोचवणे आवश्यक असून, युवकांनी या कामासाठी पुढाकार घ्यावा. बालकांसाठी असणारे कायदे, त्यांचे हक्क याविषयी प्रत्येकाला माहिती असणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय सेेवा योजनेच्या माध्यमातून याविषयी जनजागृती करता येते. त्यासाठी रासेयो स्वयंसेवकांनी माहिती करून घेणे गरजेचे आहे, असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांनी व्यक्त केले. रासेयोच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून विषय थेट नागरिकांपर्यंत पोहोचवता येतो. शिवाय अनेक दुर्लक्षित विषयांवर प्रकाश टाकता येतो. यामुळे समाजात वाढत असलेली बाल लैंगिक शोषणाच्या समस्येवर आळा बसवता येतो, असे ते म्हणाले. प्रा. नीलिमा टिंगरे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रम आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता सवाई हिने केले, तर आभार प्रदर्शन मांडवी पाटील या विद्यार्थिनींनी केले. या वेळी उपप्राचार्य डॉ. एम. आर. इंगळे, रासेयो जिल्हा समन्वयक प्रा. विवेक हिवरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय तिडके, गृहविज्ञान विभागप्रमुख डॉ. रेखा लांडे, प्रा. कपिल म्हैसने, डॉ. अंजली कावरे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.