आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Increased The Number Of Students In Akola Municipal Corporation School

महापालिका शाळांच्या विद्यार्थी संख्येत वाढ, सर्वात कमी वाढ हिंदीमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महापालिकेच्या काही शाळांमध्ये आठवा, तर एका शाळेत नववा आणि दहावा वर्ग सुरू झाल्याचा फायदा महापालिका शाळांच्या विद्यार्थिसंख्येवर पडला आहे. मागील शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत या वर्षी विद्यार्थ्यांची संख्या १९७ ने वाढली आहे. सर्वाधिक वाढ उर्दू माध्यमात, तर सर्वात कमी वाढ हिंदी माध्यमात झाली आहे. महापालिकेने या वर्षी अनेक शाळांमध्ये केजी-१ आणि सेमी इंग्रजी वर्ग सुरू केल्याने याचा परिणामही पुढील शैक्षणिक वर्षात पडणार आहे.
परंतु, यासाठी महापालिका प्रशासनाला शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे गरजेचे आहे.
महापालिका अस्तित्वात आल्यानंतर शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी काही प्रयत्न झाले. यात सूर्योदय प्रकल्पाचाही समावेश होता. परंतु, तीन वर्षांनंतर हा प्रकल्प बंद पडला, तर दुसरीकडे प्रशासनाने गुणवत्तेकडेही लक्ष दिले नाही. परिणामी, विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी घटत गेली.
यास अपवाद ठरले केवळ २०११-२०१२ हे शैक्षणिक वर्ष. या वर्षी विद्यार्थिसंख्येत १७३ ने वाढ झाली होती. परंतु, त्यानंतर पुन्हा दरवर्षी विद्यार्थिसंख्या घटत गेली. मात्र, चालू शैक्षणिक वर्ष यास पुन्हा एकदा अपवाद ठरले आहे. या वर्षीही विद्यार्थिसंख्येत वाढ झाली आहे.
विद्यार्थिसंख्येत वाढ होण्यामागे महापालिका शाळांचा सुधारलेला दर्जा अथवा वाढलेली शैक्षणिक पातळी हे कारण नाही, तर अनेक शाळांमध्ये या वर्षी प्रथमच आठवा वर्ग सुरू करण्यात आला आहे. महापालिका मराठी मुलांची शाळा क्रमांक २६ मध्ये नववा आणि दहावा वर्ग सुुरू आहे. यामुळे जे विद्यार्थी सातवी उत्तीर्ण झाल्यानंतर शाळा सोडून जात होते, ते आज पुन्हा महापालिका शाळांमध्येच राहिले आहेत. त्यामुळेच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मागील वर्षी महापालिकेच्या एकूण ५५ शाळांमध्ये सात हजार ६४८ विद्यार्थी शिक्षण घेत होते. या शैक्षणिक वर्षात ही संख्या सात हजार ८४५ वर गेली आहे.
१४ शाळांमध्ये आठवा वर्ग : महापालिकेच्या एकूण ३४ शाळांपैकी १४ शाळांमध्ये आठव्या वर्गापर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. यात मराठी माध्यमाच्या तीन, हिंदी माध्यमाच्या दोन आणि उर्दू माध्यमाच्या नऊ शाळांचा समावेश आहे, तर मराठी मुलांची शाळा क्रमांक २६ मध्ये दहावीपर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध आहे.
सूर्योदय प्रकल्पाची गरज : स्पर्धेमुळेपालक विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थिती नसताना खासगी शाळांमध्ये टाकतात. मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करता यावी, यासाठी संगणक प्रशिक्षण देणारा राज्यात आदर्श, परंतु दुर्दैवाने बंद पडलेला सूर्योदय प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची गरज आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, विद्यार्थ्यांची संख्या १९७ ने वाढली...