आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तडजोडी झाल्यामुळे संस्थांवर होणार कारवाई, समितीने घेतला 'दिव्य मराठी'च्या वृत्ताचा धसका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - 'दिव्य मराठी'च्या वृत्तामुळे संस्थाचालकांसोबत तडजोड झाली नाही. अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या 'माणसां'नी संस्थाचालकांना धमकावून तडजोडीची बातमी कशी फुटली, असा जाब शनिवारी विचारला. त्याचे परिणाम आता तुम्हाला अहवालाच्या माध्यमातून भोगावे लागतील, अशी तंबी संस्थाचालकांना दिली. समितीचे शनिवारचे रूप पाहता आता संस्थांच्या कारभारात त्रुट्या काढून कारवाईची शक्यता बळावली आहे. समितीने गुरुवारी शुक्रवारी जिल्ह्यातील काही प्रकल्प शाळांची तपासणी केली होती. त्यानंतर त्रुट्या काढून मुख्याध्यापकांना धमकावण्यात आले होते. मात्र, लगेच समितीच्या काही तडजोडकर्त्यांनी मुख्याध्यापकांना तडजोडीसाठी शनिवारी रात्री विश्राम भवनावर बोलावले होते. या वेळी त्यांच्यात तडजोड झाली होती. तडजोडीत डोळे दीपणारे आकडे पाहून संस्थाचालक गांगरून केले होते. याची माहिती 'दिव्य मराठी'च्या हाती लागल्यानंतर शनिवारच्या अंकामध्ये समितीचा खरा चेहरा उघडा पाडल्याने समितीचे पित्त खवळले. आता मंत्रालयापर्यंत आमचा बॅड मॅसेज गेल्यामुळे त्याचा परिणाम बातमी फोडणाऱ्यांना भोगावा लागेल, असा धमकीवजा इशारा देण्यात आल्याची माहिती आहे. या वृत्तामुळे शनिवारी समितीच्या तडजोडकर्त्यांना काहीही करता आले नाही. विशेष म्हणजे खरेपणाचा आव आणून शनिवारी समितीने चौकशी केल्याचे दिसून आले. जर या कारवाईची वाच्यता झाली नसती तर तेरी भी चूप अन् मेरी भी चूप अशी अवस्था झाली असती.

एका संस्थेला दिले संस्था बंद करण्याची धमकी
दिव्य मराठीला कोणतीही माहिती देणाऱ्या एका संस्थेला बातमी कशी दिली. म्हणून संस्था बंद करण्याची धमकी दिल्याची माहिती आहे. तुमच्या कर्तत्वामुळे मंत्रालय स्तरावर आमच्याबाबत वाईट संदेश गेला आहे. आता तुमची संस्थांच बंद करतो. त्यासाठी तुम्ही आता मुंबईत चकरा मारा, असे धमकावण्यात आले आहे. संबंधित संस्थाचालकांनी या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले.

वास्तविकता ही समिती अकोला जिल्ह्यासाठी आलेली होती. इतर जिल्ह्याला लागून असलेल्या काही भागांत त्यांनी दौरा केला . आणि अचानक वाशिम जिल्ह्यातील एका संस्थेवर धाड टाकली. किरकोळ त्रुट्यांचा बाऊ करत धमकावले. विशेष म्हणजे ही शाळा एका भाजप कार्यकर्तांचीच आहे. या समितीने केलेल्या सर्व पाहणी काढलेल्या त्रुटींच्या संदर्भात सक्षम अधिकाऱ्यांमार्फत पुनर्तपासणी करावी सत्य समोर येइल असा विश्वासही संस्थाचालक व्यक्त करत आहेत.

झेडपीच्याही प्रत्येक विभागाकडून तडजोड
विश्रामभवनावरील तडजोडीची शनिवारी जिल्हा परिषदेत चर्चा होती. शुक्रवारच्या रात्री येथील अधिकाऱ्यांना तंबी दिल्यामुळे त्यांनी सर्व विभागांना फर्मान सोडले होते. त्यानुसार प्रत्येक विभागाकडूनही तडजोड झाल्याची माहिती आहे. तसेच रात्रभर जिल्हा परिषेदेचे काही कर्मचारी आपल्या विभागात कशासाठी ठाण मांडून होते, त्यावरून संशय निर्माण होत आहे.