आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युतीबाबत दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- राज्यात अकोल्यासह विधान परिषदेच्या आठ जागांसाठी निवडणूक होत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे आता भाजप-सेनेच्या युतीबाबत दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात इतर ठिकाणी युती होणार असली तरी अकोल्यात मात्र मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता आहे. त्यामुळे या वेळी तिरंगी लढतीची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर मतदारसंघाच्या एकूण आठ जागांसाठी डिसेंबरच्या अखेरीस निवडणूक होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत निवडणुकीच्या तारखेची घोषणा होऊन आचारसंहिताही लागू शकते. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीची घोषणा केली आहे. अकोला स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. तिन्ही जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार कमी असताना जागा त्यांच्याच कडे आहे. त्यामुळेच या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही जागा काँग्रेसने मागावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. काही इच्छुकांनी प्रचारही सुरू केला होता. परंतु, आघाडीची घोषणा झाल्याने आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
त्यामुळे आता ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मागच्या निवडणुकीत राधेश्याम चांडक यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, या वेळी त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळेच रवींद्र सपकाळ यांनी उमेदवारीसाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. विशेष म्हणजे त्यांनी भेटीगाठीही सुरू केल्या आहेत. एकीकडे काँग्रेस आघाडीची घोषणा झाली असताना दुसरीकडे युतीचे भिजत घोंगडे कायम आहे. परंतु, बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे भाजप आता मित्रपक्षांना जवळ घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच भाजप-सेनेची युती जवळपास निश्चित मानली जात आहे. परंतु, अद्याप अधिकृत घोषणा झाल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निवडणुकीबाबत राजकीय क्षेत्रात चांगलीच चर्चा सुरू अाहे.

नगरसेवकांचे चांगभलं
स्थानिकस्वराज्य संस्थेची निवडणूक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती यांच्यासाठी दिवाळी ठरते. उमेदवाराला घोडे खरेदी करावे लागणार असल्याने घोडेबाजार तेजीत येतो. त्यात तिरंगी लढत झाल्यास ही निवडणूक नगरसेवकांसाठी ‘चांगभलं’ ठरणार आहे.

अकोला अपवाद ठरण्याची शक्यता?
भाजप-सेनेचीयुती जवळपास निश्चित मानली जात असताना आठ जागांपैकी अकोल्याची जागा मात्र अपवाद ठरू शकते, अशी विश्वसनीय माहिती मिळाली आहे. त्यामुळे अकोला स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजप-सेनेत मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता व्यक्त केली जात आहे. अकोल्यात भाजप-सेनेत मैत्रीपूर्ण लढत झाल्यास या वेळी तिरंगी लढत होईल.
मध्यावधीच्या तयारीला लागण्याच्या मिळाल्या सूचना
विश्वसनीयसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सत्तेतील भाजप-सेनेतील वादामुळे युती शासन जास्त काळ टिकण्याची शक्यता नाही. विशेष म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री केल्यास बाहेरून पाठिंबा द्यायला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी दर्शवली आहे. तशी ऑफरही देण्यात आली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना मध्यावधीच्या तयारीला लागण्याची सूचनाही केली आहे.

युतीबाबत दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता