आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपात राजरंग, ‘स्थायी’मुळे पुन्हा अंतर्गत धुसफूस सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- गटबाजीतून सावरलेल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील नगरसेवकांमध्ये स्थायी समिती अस्तित्वात येणे पुन्हा लांबणीवर पडत असल्याने अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. पूर्वी चव्हाट्यावर होणाऱ्या धुसफुशीचे आता कुजबुजीत रूपांतर झाले आहे. परंतु, यातून एकमेकांविषयीची मने मात्र, कलुषित असल्याची बाब उघड झाली आहे.
अकोला महापालिकेमध्ये दोन-अडीच वर्षांनंतर स्थायी समिती अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला. स्थायी समितीला असलेले अधिकार लक्षात घेऊनच खऱ्या अर्थाने अंतर्गत राजकारणाला प्रारंभ झाला. यातूनच कुरघोडीचे राजकारण सुरू झाले. एकमेकांना शह-काटशह देण्याच्या नादात महासभा होऊ देण्यापर्यंत टोकाची भूमिका घेतल्या गेली. परिणामी, निधी उपलब्ध असताना विकासकामेही थांबली.
भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे कर भरणारा सर्वसामान्य नागरिक वेठीस धरल्या गेला. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही या गटबाजीत सामील झाल्याने ही गटबाजी थांबवणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, अखेर काही नेत्यांनी पुढाकार घेतल्यानंतर काहीअंशी ही गटबाजी थांबली. त्यामुळे रखडलेल्या महासभेचा मार्गही मोकळा झाला. आता काही सर्व आलबेल झाल्यासारखे चित्र निर्माण झाले. आता स्थायी समितीही अस्तित्वात येईल, अशी आशा निर्माण झाली. परंतु, न्यायालयात सुरू असलेल्या स्थायी समितीच्या सुनावणी प्रकरणात भूमिका स्पष्ट करण्यास पुन्हा एका गटाकडून टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे स्थायी समिती अस्तित्वात येण्यात अडचणी निर्माण झाल्या. यामुळेच पुन्हा अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे.
कारण निवड झालेल्या १६ पैकी आठ सदस्य फेब्रुवारी महिन्यात निवृत्त होणार आहेत. त्यामुळे यापुढे स्थायी समिती अस्तित्वात आल्यास या आठ सदस्यांना सहा महिन्यांचा कालावधीही मिळणार नाही. त्यामुळेच असंतोषाचे वातावरण पुन्हा निर्माण झाले आहे. एकंदरीत महापालिकेतील राजकारणामुळे एकमेकांविषयीची मने कलुषित झाली असून, यामुळे शहर विकासाला खीळ बसली आहे.
पाठिंबा देणाऱ्यांचीही नाराजी
भाजपला ज्या अपक्ष गटांनी सत्ता हस्तगत करण्यासाठी पाठिंबा दिला. त्यांपैकी काही सदस्यांना स्थायी समितीत घेण्यात आले आहे. स्थायी समिती अस्तित्वात येत नसल्याने हे सदस्यही नाराज झाले आहेत. आमच्या भरवशावर सत्ता मिळवायची आणि आमच्याकडेच जाणूनबुजून दुर्लक्ष करायचे, अशी प्रतिक्रिया पाठिंबा देणाऱ्या एका नगरसेवकाने नाव छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.