आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरटेल ‘फोर-जी’चे काम नियमबाह्यरीत्या,अग्रवाल, शेगोकार यांची आयुक्ताकंडे तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - एअरटेलफोर-जी चे केबल टाकण्याचे काम महापालिकेसोबत केलेल्या करारनाम्यानुसार होत नसून या कामामुळे रस्त्यावर चिखल साचला जात आहे. त्यामुळे केबल टाकण्याचे काम झालेल्या करारनाम्यानुसार करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका सुनीता अग्रवाल आणि माजी नगरसेवक सागर शेगोकार यांनी आयुक्त अजय लहाने यांच्याकडे केली.
रिलायन्स कंपनीचे फोर-जी चे केबल टाकण्याचे काम नियमानुसार मशीनद्वारे टाकले जात होते. मात्र, त्या वेळी अनेक नगरसेवकांनी तक्रारी केल्या, तर याउलट एअरटेल कंपनीचे केबल टाकण्याचे काम मॅन्युअली पद्धतीने केले जात आहे. एअरटेल कंपनीला नऊ किलोमीटरच्या सहा रस्त्यांवर केबल टाकण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी लागणारे चार कोटी २० लाख रुपयांचा भरणादेखील कंपनीने केला आहे. कंपनीसोबत झालेल्या करारनाम्यानुसार एचडीडी पद्धतीनुसार केबल टाकावी लागणार आहे. या पद्धतीत केबल टाकण्यासाठी मशीनचा वापर केला जातो. एका ठिकाणी खड्डा खोदून मशीनद्वारे जमिनीत केबल टाकली जाते. रिलायन्स कंपनीने या पद्धतीनेच केबल टाकली. मात्र, एअरटेल कंपनीने केबल टाकताना या पद्धतीचा वापर करता मॅन्युअली केबल टाकण्याचे काम सुरू आहे. यामुळे खोदलेली माती रस्त्यालगत आली असून, त्यामुळे चिखल साचला आहे. ही बाब लक्षात येताच नगरसेविका सुनीता अग्रवाल आणि सागर शेगोकार यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली.

सुनीता अग्रवाल आणि सागर शेगोकार यांनी आयुक्तांची भेट घेऊन रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी केली. तूर्तास आयुक्तांनी यापुढील केबल टाकण्याचे काम नियमानुसारच करण्याची सूचना कंपनीला करण्यात येईल, अशी ग्वाही देऊन दुरुस्तीचे कामही केले जाईल, असे आश्वासन दिले.
बातम्या आणखी आहेत...