आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाच्या मदतीची "पालकां'कडून अपेक्षा, शासनाकडे पाठपुरावा करण्याची अपेक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- काहीवर्षांपासून विविध समस्यांवर मात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना आता दुष्काळाच्या मदतीची अपेक्षा आहे. असे असतानाच शासनाने एक हजार ७६६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या बुलडाणा जिल्ह्याला दुष्काळग्रस्त जिल्ह्याच्या यादीतून वगळले. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ खडसे हेच महसूलमंत्री असतानाही झालेल्या अन्याय झाल्याची शेतकऱ्यांची भावना असून, याची गांभीर्याने दखल घेऊन महसूलमंत्री खडसे यांनी जिल्ह्याला दुष्काळाची मदत मिळव्ून द्यावी, ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच तशा प्रतिक्रियाही उमटत आहे.

मागील १५ वर्षांत जिल्ह्यातील १८२ शेतकऱ्यांनी नापिकीमुळे, तर ५५८ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. २०१५ पासून आजपर्यंत नापिकीमुळे २७, तर कर्जबाजारीपणामुळे २६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा शासकीय अाकडा आहे. हा आकडा २०१४ च्या तुलनेत कमी आहे. २०१४ मध्ये नापिकीमुळे ४१, तर कर्जबाजारीपणामुळे ४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या वेळी शेतकऱ्यांना चाराटंचाईची चिंता आहे. १३ लाख ३१ हजार मेट्रीक टन चाऱ्याची आवश्यकता दहा लाख ९७ हजार जनावरांना भासणार आहे. त्यातच जिल्ह्यात ८७ टक्के पाऊस झाला आहे. पावसाअभावी तूर, सोयाबीन पिकांमध्ये घट होण्याची शक्यता आहे. अशावेळी पालकमंत्री खडसे यांनी पाठपुरावा करून जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सिंचनाद्वारे होताहेत प्रयत्न
जिल्हाप्रशासन सध्या नरेगाअंतर्गत आत्महत्याग्रस्त पात्र अपात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबास विहिरी बांधकामासाठी प्रयत्न करत आहे. तीन महिन्यात २८ कोटी रुपये खर्चही करण्यात आले आहे. जलयुक्त शिवाराचा फायदाही शेतकऱ्यांना आगामी काळात होणार आहे. परंतु, सध्या पर्जन्यमान कमी झाल्यामुळे पिकांचे उत्पन्न घटले असे असताना बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाल्यामुळे राजकीय स्तरावर शासनाविरोधात राेष व्यक्त होत असताना आणखी अंतिम आणेवारीनंतर जिल्हा दुष्काळग्रस्त होणार असल्याचे सत्ताधारी सांगत आहेत. मात्र, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाने दर्शवलेली आत्महत्येची कारणे अशी
शेतकरीआत्महत्याप्रकरणी मदत देण्यासाठी पात्र अपात्र लाभार्थी ठरवण्यात येतात. विविध कारणांमध्ये आजारीपणामुळे २३६, व्यसनाधीनतेमुळे १४०, अपघातामुळे १६, बेरोजगारीमुळे २८, तर घरगुती भांडणामुळे ५६२ शेतकऱ्यांनी १५ वर्षांत आत्महत्या केल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती आहे.
१५ वर्षांतील शेतकरी आत्महत्या
वर्ष नापिकी कर्ज
२००१ ०० ०४
२००२ ०० ०६
२००३ ०१ ११
२००४ ०२ ३६
२००५ ०६ ३३
२००६ २७ ७२
२००७ ०५ ३७
२००८ ०० ५२
२००९ ०१ ४८
२०१० १४ ५३
२०११ ०० ५२
२०१२ ३२ ४८
२०१३ २६ ३१
२०१४ ४१ ४९
२०१५ २७ २६