कारंजा- येथील वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता अजय महादेवराव पिंगे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी सशस्त्र हल्ला केला. या घटनेत ते जखमी झाले असून त्यांच्या कारचे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवार (ता. ८) रोजी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास शहरापासून चार कि. मी. अंतरावरील राधे राधे पेट्रोलपंपाजवळ घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अजय पिंगे (वय ४२) मंगळवारी रात्री वाजताच्या सुमारास कंपनीच्या काण्णव जीनमधील कार्यालयातून जेवण करण्यासाठी मंगरूळपीर रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळील तिरूमला ह\\टेल येथे गेले होते.
तेथून महावीर ब्रह्मचर्याश्रममधील निवासस्थानी चालले होते. मार्गात राधे राधे पेट्रोलपंपासमोर रस्त्याच्या डाव्या बाजूूला असलेल्या झुडूपातून अचानक एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या वॅगनार कंपनीची कार (एमएच 30 पी-2320) समोर आला काठी मारून समोरील हेडलाईट फोडला. कार थांबताच लगेच कारच्या दोन्ही बाजूने दोन व्यक्ती आल्या, त्यांनी काठीने फायटर सारख्या शस्त्राने पिंगे यांच्या पाठ, छाती हातावर हल्ला केला. तसेच एका जणाने त्यांचे तोड धरून कारच्या स्टेअरिंगमध्ये दाबले. घटनेत पिंगे जखमी झाले. त्यानंतर तिन्ही अज्ञात हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. जखमी अवस्थेत पिंगे यांनी घटनेची माहिती सहायक अभियंता सुशीलकुमार शुक्ला यांना भ्रमणध्वनीवरून दिली. त्यांनी वीज कंपनीच्या कर्मचा-यांसह घटनास्थळ गाठले पिंगे यांना उपचारासाठी येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. या प्रकरणी अजय पिंगे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात जमादार सुधाकर पवार करत आहेत.
स्थानिक काण्णव जीनमधील वीज कंपनीच्या कार्यालय परिसरात एस.ई.ए.संघटना, मागासवर्गिय संघटना, इंटक संघटना, वर्कर्स फेडरेशन, तांत्रिक संघटना, तांत्रिक कामगार संघटनेच्या कर्मचा-यांनी जमा होवून निषेध सभा घेतला. या सभेत श्री पिंगे यांच्यावरील हल्ल्याचा कर्मचा-यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला. या सभेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. उपकार्यकारी अभियंता पिंगे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे संताप व्यक्त झाला.
वीज कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
वीजवितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता अजय पिंगे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधाधार्थ कंपनीच्या विविध कर्मचारी संघटनेच्या वतीने बुधवार (ता. ९) रोजी काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन करण्यात आले. आरोपींना त्वरित अटक केली नाही तर कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.