आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता पालकमंत्री अन् कलेक्टरांचा पुढाकार, पेट्रोलियम कंपन्यांचे अधिकार्‍यांची बैठक बोलावणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शासनानेएलबीटी रद्द करण्याचा निर्णय लागू केला. मात्र, अकोला शहरात त्यानंतरही पेट्रोल, डिझेलचे दर कमी झालेले नाहीत. याप्रश्नी दैनिक दिव्य मराठीने प्रकाश टाकत ग्राहकांची लूट होत असल्याचे प्रशासनाच्या निर्दशनास आणून दिले. या प्रश्नावर पेट्रोलियम कंपन्यांचे अधिकारी आणि संबंधितांची बैठक बोलावून चौकशी करून प्रश्न निकाली काढू, अशी भूमिका पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी घेतली आहे. या बैठकीसाठी जिल्हाधिकारीही पुढाकार घेत आहेत.

एलबीटी बंदीनंतरही शहरातील १३ पेट्रोलपंपांनी आपले दर कायम ठेवून ग्राहकांची लूट सुरूच ठेवली. महापालिकेचे अधिकारी कंपनीचे सेल्स ऑफिसर यांच्या बोलण्यात तफावत आढळून येत आहे. कोट्यवधी रुपयांची विक्री होत असताना प्रत्यक्षात मात्र, महापालिकेकडे दोनच पेट्रोलपंप ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उलाढालीचे असल्यामुळे एलबीटीचा भरणा करीत असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली, तर भारत पेट्रोलियम कंपनीचे सेल्स ऑफिसर कपिल पोतदार यांनी भारत पेट्रोलियम कंपनीच्या चार पेट्रोलपंपांवर एलबीटी आकारल्या जात असल्याचे सांगितले. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे सेल्स ऑफिसर अभय कुमार यांच्याकडे कोणत्या पेट्रोलपंपावर एलबीटी आकारल्या जाते, याची काहीही माहिती उपलब्ध नसल्याचे दिसून आले.

तर इंडियन ऑइल कंपनीचे सेल्स ऑफिसर प्रमोद गंडारे यांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला शहरातील पेट्रोलपंपांवर एलबीटी आकारल्या जात असल्याचे सांगत ग्रामीणमध्ये एलबीटी आकारण्याचा प्रश्न नसल्याची माहिती त्यांनी दिली. दोनही विभागांच्या बोलण्यात तफावत आढळल्याने एलबीटीचा तिढा आणखी वाढला आहे. नव्या निकषानुसार ५० कोटींपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या प्रतिष्ठानांनाच एलबीटी द्यावा लागणार आहे.

संग्रहित छायाचित्र
दोनच पेट्रोलपंप ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उलाढालीचे.
एलबीटी बंदीनंतरही शहरातील १३ पेट्रोलपंपांनी आपले दर कायम ठेवले.

तिढा बैठकीतून सुटेल
पालकमंत्रीडॉ. रणजित पाटील यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की, याप्रकरणी जिल्हाधिकारी, महापालिकेचे आयुक्त पेट्रोलियम कंपन्यांचे अधिकारी यांची लवकरच संयुक्त बैठक बोलावणार आहे. सरकार जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे असून, निश्चितच हा तिढा बैठकीतून सुटेल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली.

संयुक्त बैठक बोलावणार
याप्रकरणातील सत्यता जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या सहकार्याने शहरातील पेट्रोलपंपांचे भाव घेतले. पेट्रोल डिझेलमध्ये एलबीटी आकारल्या जात असल्याचे निदर्शनास आले. पेट्रोलपंपांवरील भावातील तफावत दूर करण्यासाठी पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी महापालिकेचे अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले.