आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिरत्या वाहनात न्यायाधीश, महिनाभर चालणार न्यायदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - समाजातील पददलीत आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना त्यांच्या सोईनुसार विधी सहाय्य मिळावे म्हणून आज, शुक्रवारपासून जिल्ह्यात ‘फिरते न्यायालय’ दाखल झाले आहे. या न्यायालयाचा मुक्काम महिनाभर राहणार असून या काळात न्यायाधीश महोदय चक्क आपल्या दारी येऊन न्यायनिवाडा करणार आहेत. 
 
प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या हस्ते या न्यायालयाचा प्रारंभ झाला. त्यासाठी जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर स्वत: कलासागर यांनी वाहनाला हिरवी झेंडी दाखवली. त्यानंतर आज दिवसभर हे वाहन बोरगाव मंजू येथील ग्रामपंचायत कार्यालयात होते. 
 
उद्या, शनिवारी हे न्यायालय स्थानिक पंचायत समिती कार्यालयात राहणार आहे. हे फिरते न्यायालय म्हणजे प्रत्येकी एक न्यायाधीश, वकील लिपीक आणि इतर साधन-सामग्रीसह सुसज्ज असे वाहन आहे. या वाहनात ध्वनीक्षेपण यंत्रणा, संगणक इतर यंत्रे लावण्यात आली आहेत. विशेष असे की या वाहनाचा मुक्काम ज्या गावात असेल त्या गावापासून तीन किलोमीटरच्या परिघातील इतर गावांच्या अपीलार्थींनाही या लोकअदालतीमध्ये सहभागी करुन घेतले जाते. न्यायालयातर्फे वारंवार दिल्या जाणाऱ्या तारखांमुळे अनेक जण न्याय प्रक्रियेवर नाखूष असतात. शिवाय पैसा आणि वेळेचा अपव्यय होतो, अशी त्यांची धारणा बनते. या बाबीला छेद देणे हाही या आयोजनाचा एक उद्देश आहे. 
 
महिनाभराच्या प्रवासात हा उपक्रम अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, बार्शिटाकळी मुर्तीजापूर तालुक्यातही राबवला जाईल. या अदालतीद्वारे दीड हजारांवर प्रकरणांचा न्यायनिवाडा केला जाईल, असे नियोजन करण्यात आले आहे. मोटार वाहन कायदा, आपसी वाद-विवाद, बँकांची वसुली, वजन-मापांच्या तक्रारी, कौटुंबीक वाद आदी प्रलंबीत खटल्यांची सुनावणी फिरत्या अदालतीत केली जाईल. 
 
प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे प्रभारी सचिव न्या. एन. जी. शुक्ल यांनी केले. संचालन दीवाणी न्यायाधीश ए. सी. बिराजदार यांनी केले. आभार अकोला जिल्हा वकील संघाचे सचिव अॅड. इलीयास शेखानी यांनी मानले. 

या आयोजनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. एस. पी. पोळ, अधीक्षक आर. एम. निकुंभ, इतर कर्मचारी एस. पी. टाकळीकर, कुणाल पांडे, शहाबाज खान, जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी आदी अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. 
 
मान्यवरांची उपस्थिती 
उद्घाटनाच्या वेळी प्रभारी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा न्यायाधीश जी. जी. भालचंद्र व्ही. डी. केदार, तदर्थ न्यायाधीश डी. पी. शिंगाडे पी. जी. पाटील, फिरत्या न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. हिरुरकर, वकील संघाचे उपाध्यक्ष जी. के. खाडे आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
बातम्या आणखी आहेत...