आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या नातेवाइकांविरुद्धची पतीची याचिका केली खारीज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- सासरच्या लोकांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे पतीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. पोलिसांना कारवाई करण्याचे न्यायालयाने आदेश द्यावे, अशी विनंती करणारी याचिका पतीने न्यायालयात केली होती. मात्र, त्यासंबंधीचा पुरावा नसल्यामुळे न्यायालयाने याचिका खारीज केली.

संदीप मोतीलाल तायडे याचा विवाह स्मितासोबत १० जुलै २०११ ला हिंदू रीतीरिवाजानुसार झाला होता. विवाहाच्या काही दिवसांनंतर सासरचे लोक माहेरहून एक लाख रुपयांची मागणी करीत असल्यामुळे आपला शारीरिक मानसिक छळ केल्याचा आरोप स्मिताने केला होता. या संबंधातील तक्रार तिने जुने शहर पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी संदीप मोतीलाल तायडे, सुनंदा मोतीलाल तायडे, अनिल माेतीलाल तायडे, वैशाली अनिल तायडे, विजय मोतीलाल तायडे, कल्पना विजय तायडे यांच्या विरोधात कलम ४९८अ, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले होते. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, स्मिताने तिच्या उदरनिर्वाहासाठी पोटगीचा अर्ज न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयाने तो मंजूरही केला होता. यादरम्यान १५ डिसेंबर २०१४ ला पती संदीप तायडे याने न्यायालयाच्या समोर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार रामदासपेठ पोलिस ठाण्यात स्मिताच्या नातेवाइकांनी दिल्यानंतर ती दाखल करण्यात आली होती. त्यानंतर संदीप तायडे यानेसुद्धा रामदासपेठ पोलिस ठाण्यात परस्परविराेधी तक्रार देताना म्हटले की, २४ डिसेंबर रोजी न्यायालयात जाताना स्मिताच्या नातेवाइकांनी त्याला रस्त्यात अडवून प्रकरण आपसात करण्यासाठी १५ लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने त्या सर्वांनी संदीपला मारहाण करून त्याच्या खिशातील १६०० रुपये काढून घेतले. मात्र, पोलिसांनी ही तक्रार चौकशीत ठेवली होती. रामदासपेठ पोलिसांकडून या प्रकरणात कारवाई करण्यात आल्यामुळे संदीप तायडे याने वकिलाच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल केली पत्नीच्या नातेवाइकांविरोधात कारवाई करण्याची विनंती केली. या प्रकरणाची सुनावणी प्रथम श्रेणी न्यायाधीश गजाला अल अमोदी यांच्या न्यायालयात झाली.