आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कापशी’तून भागवता येईल तहान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहराची१९५५ पर्यंत तहान भागवणारा कापशी तलाव भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यास मदत करणारा ठरू शकतो. गाळ काढण्यासह जलशुद्धीकरण केंद्र उभारणीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवून निधी खेचून आणल्यास हा तलाव आजही ५० हजारांपेक्षा जास्त नागरिकांची तहान भागवण्यास समर्थ ठरू शकतो.
कापशी तलाव खोदण्याची योजना १८९० ला आखली गेली. १८९१ ला तलावाचे काम सुरू झाले. १९१८ ला तलावाचे काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरू झाला. १९५५ पर्यंत कापशी तलाव हेच एकमेव पाणीपुरवठ्याचे साधन होते. पुढे कौलखेडा पाणीपुरवठा योजना नंतर काटेपूर्णा प्रकल्प अस्तित्वात आला, तरीही कापशी तलावातून १९८० पर्यंत पाणीपुरवठा सुरू होता. १९८० नंतर या तलावाकडे मात्र दुर्लक्ष झाले. त्यामुळे कधीकाळी शहराची तहान भागवणारा कापशी तलाव भकास झाला. तलावात गाळ मोठ्या प्रमाणात साचला, तर तलावाच्या काठी बेशरम वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढली तसेच काही प्रमाणात खुल्या जागेवर अतिक्रमणही झाले.
तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर रोकडे यांच्या कार्यकाळात तलावातील गाळ काढण्याचे काम काही प्रमाणात झाले. परंतु, गाळ काढण्याची ही मोहीम पूर्ण होऊ शकली नाही. आज पाऊस लांबल्याने पुन्हा एकदा शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यासाठीच मोर्णा प्रकल्पातील पाणी महान जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्यासाठी जलवाहिनीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे. यातून शहरासाठी दशलक्षघनमीटर पाणी उपलब्ध होईल. याच धर्तीवर कापशी तलावाचा गाळ काढून त्याची साठवण क्षमता वाढवल्यास आणि जलशुद्धीकरण केंद्र उभारल्यास दीड ते दोन दशलक्षघनमीटर पाणी शहरासाठी उपलब्ध होऊ शकते.

ग्रॅव्हिटीनेच हाेत हाेता पाणीपुरवठा
कापशीतलाव ते अकोला हे अंतर १४ किलोमिटर आहे. कापशी तलावातून यापूर्वीही होणारा पाणी पुरवठा ग्रॅव्हिटीनेच होत होता. त्यामुळे पाणी पुरवठा करण्यासाठी पंपींगची गरज नाही. केवळ कापशी तलाव परिसरात जलशुद्धीकरण केंद्र उभारल्यास या तलावातून पाणी पुरवठा होऊ शकतो. त्याचा फायदा नागरिकांना हाेईल.

नागरिकांसाठी भविष्यात पाणी आणणार कुठून?
शहराचीवाढती लोकसंख्या, काटेपूर्णा प्रकल्पातील आरक्षण पाणी आणि महापालिकेची होणारी हद्दवाढ, या बाबी लक्षात घेतल्यास शहराला पाणी पुरवठा करणार कोठुन? असा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळेच कापशी तलावाचा प्रस्ताव तयार केल्यास भविष्यातील पाणी टंचाईचा सामना करण्यास अथवा हद्दवाढी नंतर काही लहान गावांना या तलावातून पाणी पुरवठा करणे शक्य आहे.

तलावाने शंभर वर्ष पूर्ण केले आहेत. त्यामुळे तलावात गाळ साचला आहे. त्यामुळे साठवण क्षमतेवर परिणाम झाला आहे. तलाव खोदल्यास तलावात दीड ते दोन दशलक्षघनमिटर पाणी उपलब्ध होऊ शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

गाळ काढल्यास दीड ते दोन दलघमी पाणी
अकोला शहराचा पाणीपुरवठ्याचा इतिहास मोठा रंजक आहे. १८५३ पर्यंत नागरिकांची तहान मोर्णा नदीच भागवत असे. नदी बारमाही नसल्याने नदी पात्रात विहिरी खोदून त्यातून पाणी घेतले जात असे. १८६५ नंतर पाणीपुरवठ्याकडे राज्यकर्त्यांनी लक्ष दिले. मोर्णा नदीवर बांध घालून प्रथमच सहा इंची पाइपलाइनच्या माध्यमातून पुरवठा सुरू झाला. नेहरू पार्कमधील दगडांच्या टाकीत हे पाणी संकलित करून नागरिकांना दिले जात असे. उन्हाळ्याच्या दिवसात पाणी अपुरे पडू लागल्याने नंतर कापशी तलाव योजना अस्तित्वात आली.
कापशी तलावातून शहरात पाणीपुरवठा करता येणे शक्य अाहे.


कापशी तलावातून हाेत हाेता १८ तास पाणी उपसा
१९५५पर्यंत कापशी तलावातून १८ तास पाणी उपसा केला जात असे. दररोज सहा लाख ५० हजार गॅलन पाणीपुरवठा होत असे. या पाणीपुरवठ्यानुसार आणि सद्य:स्थितीत सुरू असलेला दरडोई १०० लीटर पाणी या सूत्रानुसार किमान ४५ ते ५० हजार नागरिकांची तहान भागवू शकतो. गाळ काढल्यास यापेक्षा अधिक नागरिकांची तहान भागवण्यासही हा तलाव समर्थ आहे.

कापशी तलावाबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव नाही
^कापशीतलावाबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव तयार केलेला नाही. परंतु, भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी या तलावातील पाण्याची उचल करावी लागेल. यासाठी तलावातील गाळ काढणेही गरजेचे आहे.'' सुनीलकाळे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग.
पूर्वी पाणी पुरवठ्याचे प्रमाण गॅलनमध्ये मोजले जायचे. १९५५ पर्यंत कापशी तलावातून शहराला दररोज सहा लाख ५० हजार गॅलन पाणी पुरवठा केला जात असे. (३.७८५ लिटर म्हणजे एक गॅलन)

१९५५ पर्यंत साडेसहा लाख गॅलन पाणीपुरवठा
महापालिकेच्या दप्तरी कापशी तलावाच्या साठवण क्षमतेची नोंद नाही. त्यावेळी गॅलन पद्धतीने पाणी पुरवठा केला जात होता. त्यामुळे गॅलनच्या प्रमाणात नोंद असणे गरजेचे असताना. तशी नोंदही नाही. काहींच्या मते तीन दलघमी साठवण क्षमता आहे.