आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किडनी तस्करी प्रकरणाचा तपास अखेर सीआयडीकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - आंतरराष्ट्रीयस्तरावर गाजत असलेल्या किडनी तस्करी प्रकरणाचा तपास अखेर मंगळवारी राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला. सोमवारी हा तपास सीआयडीकडे सोपवण्याचे आदेश जिल्हा पोलिसांना प्राप्त झाल्यामुळे या संबंधीची सर्व कागदपत्रे सीआयडीकडे वर्ग करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाचा नव्याने तपास सीअायडी करणार आहे.

किडनी तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल होऊन ९० दिवस झाले. मात्र, या गुन्ह्यातील प्रमुख भूमिका बजावणाऱ्या डॉक्टरांपर्यंत पोलिसांना कायद्याच्या पळवाटांमुळे पोहोचताच आले नाही. सुरुवातीपासून पोलिसांनी या प्रकरणात गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता फसवणुकीपर्यंतच हा तपास सीमित ठेवल्याचे दिसून आले. मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार कारवाई होणे अपेक्षित असताना पोलिसांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल करून तपासाची तुतारी वाजवली होती. जुने शहरातील गरीब लाेकांच्या किडनीचा सौदा करून त्या धनाढ्यांना विकण्यात आल्या होत्या. मात्र, ठरलेली रक्कमही पीडितांना देण्यात आल्यामुळे हे प्रकरण समोर आले होते. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणी सुरुवातीला पीडितांची फसवणूक केली म्हणून दलालांची भूमिका निभावणाऱ्यांना अटक केली होती. मात्र, याप्रकरणी एकाही डॉक्टरला अटक करण्यात आली नव्हती.

श्रीलंकेत औरंगाबादेत काढल्या किडन्या
शहरातील पीडितांच्या किडन्या श्रीलंकेत औरंगाबादेत काढण्यात आल्या. याप्रकरणी दलालांची भूमिका निभावली म्हणून सांगली येथील शिवाजी कोळी मेहकर येथील विनोद पवार, अकोल्यातील देवेंद्र सिरसाट, आनंद जाधव यांना पोलिसांनी अटक केली होती.

सीआयडी हे कलम लावेल काय
सीआयडीकडे या प्रकरणाचा तपास गेल्यामुळे सीआयडी आता या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टरांवर मानवी अवयव प्रत्यारोपण अधिनियम सन १९९४ कलम १८, २१ अन्वये गुन्हा लावेल काय? हॉस्पिटल, लॅब रिपोर्ट, प्रिस्क्रिप्शन देणारे डॉक्टरांची भूमिका संशयास्पद असल्यामुळे आरोपींविरुद्धचा एचओटी अॅक्ट म्हणजेच व्होटाचे १९९४ च्या कायद्यान्वये गुन्हे दाखल करेल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हे तर पोलिसांचे अपयश
पोलिसांनी या प्रकरणात व्यवस्थित तपास केला नाही, गुन्ह्याच्या खोलापर्यंत त्यांना जाता आले नाही, म्हणून या प्रकरणाचा तपास अखेर सीआयडीकडे गेल्याची चर्चा आहे. एखाद्या गुन्ह्यात पोलिसांना तपासात यश मिळत नसते तेव्हाच त्या प्रकरणाचा तपास हा सीआयडी किंवा सीबीआयकडे जात असतो. म्हणून या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे जाणे म्हणजे हे पोलिसांचे अपयशच नाही काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.