आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वकिलाचे किडनी प्रत्यारोपण; विनोद पवारने केली मध्यस्थी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - किडनी तस्करी प्रकरणात अटकेत असलेला आरोपी विनोद पवारने औरंगाबाद येथील हायकोर्टाच्या वकिलास किडनी देण्यास मध्यस्थी केल्याचा खुलासा पाेलिस तपासात समोर आला. अधिक तपास करण्याकरिता पोलिसांनी सोमवारी आरोपी विनोद पवारची पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी मान्य करत न्यायालयाने पवारची कोठडी पाच दिवसांनी वाढवली,तर अकोल्याच्या पीडिताचे बनावट कागदपत्र नंदुरबार येथून बनवल्याचे समोर आले आहे. किडनी तस्करीप्रकरणी पीडित शांताबाई खरात यांच्या तक्रारीवरून जुने शहर पोलिस ठाण्यात विनोद जगराम पवार रा. मांडवा ता. मेहकर देवेंद्र सिरसाट यांच्याविरुद्ध भादंवि ४१७,४२० अन्वये डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी डिसेंबर राेजी पवारला अटक केली होती. त्याला पोलिस कोठडीत घेतल्यानंतर कुणाची किडनी घेतली आणि अनेकांना किडनी देण्यासाठी त्याने कशी मध्यस्थी करून पीडिताची फसवणूक केल्याचा तपास पोलिस करत आहेत. या आरोपीला पोलिस दोन वेळा औरंगाबाद येथे तपासकामी घेऊन गेले होते. त्यात आरोपी विनोद पवार याने आणखी एका प्रकरणात औरंगाबाद येथील अॅड. संतोष बोरा यांच्या किडनी प्रत्यारोपण प्रक्रियेत मध्यस्थी केली होती, असे उघडकीस आले. याबाबत पोलिस आरोपीला पुन्हा आैरंगाबादला नेऊन आर्थिक व्यवहार कसा झाला हे तपासणार आहेत. किती लोकांच्या किडनी प्रत्यारोपणात विनोद पवार याने मध्यस्थी केली, किडनी देणारे किडनी घेणारे तसेच त्यांचे नातेवाईक यांच्यातील आर्थिक व्यवहाराबाबत आणि त्यांचे खाते तपासणी करण्यासाठी २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकार पक्षाच्या वतीने अॅड. पी. पी. इंगळे यांनी केली होती. मात्र, न्यायालयाने १८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सी. टी. इंगळे करत आहेत. व्याजाने पैसे देऊन ते वसूल करण्यासाठी दलालांनी गरिबांची फसवणूक करून त्यांच्या किडनी विकल्याचे समोर आल्यानंतर राज्यभर पसरलेेल्या किडनी तस्कर रॅकेटचा तपास अकोला पोलिस करत असून, रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. मात्र, या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यात एकाही डॉक्टरचा समावेश नाही, हे विशेष.

पीडिताने बनवले खोटे कागदपत्र
हरिहरपेठ येथे राहणारा किडनी देणारा देवानंद गोपालस्वामी कोमलकर याने किडनी देण्यासाठी खोटे कागदपत्र बनवले आहेत. हे कागदपत्र त्याने बिल्डा ता. नवापूर, जिल्हा नंदुरबार येथून बनवले आहेत. त्यामध्ये रहिवासी, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, तहसीलदारांच्या दाखल्याचा समावेश आहे. या कागदपत्रांची तपासणी पोलिस करणार असून, पीडिताने खोटी कागदपत्रे का बनवली याचा शोध पोलिस घेणार आहेत.

बजाज हॉस्पिटल घाटी रुग्णालयाची चौकशी
पोलिस पथक शनिवारी औरंगाबाद येथे तक्रारदार शांताबाई खरात आरोपी विनोद पवार यांना घेऊन गेले होते. ते कुठे थांबले, कुणाशी भेटले याची माहिती पोलिसांनी घेतली आहे. मात्र, दुसरा शनिवार, रविवारी सुटी आल्यामुळे कमलनयन बजाज हॉस्पिटल घाटी रुग्णालयातील कागदपत्रांची तपासणी पोलिसांना करता आल्यामुळे पोलिस पुन्हा मंगळवारी आरोपीला आैरंगाबाद येथे घेऊन जाणार आहेत.

मुख्य सूत्रधार कोळी वाशी न्यायालयात हजर
मुख्य सूत्रधार शिवाजी कोळी याला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस मुंबई येथे किडनी तस्करीचे रॅकेट शोधण्यासाठी रविवारी घेऊन गेले होते. शिवाजी कोळीची पोलिस कोठडी सोमवारी संपणार असल्यामुळे त्याला अकोला न्यायालयात हजर करणे आवश्यक होते. मात्र, पोलिस त्याला वाशीहून अकोल्यात सोमवारी आणू शकल्यामुळे पोलिसांनी त्याला वाशी येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची पोलिस कोठडी एका दिवसाने वाढवून दिली आहे. किडनी तस्करीचा मुंबई वाशीची काय संबंध आहे याचा तपास पोलिस करत आहेत.

आरोपीला किडनी देणारा बेपत्ता
आरोपी विनोद पवार याने स्वत:साठी अकोल्यातील हरिहरपेठेतील अजय उर्फ आनंद चावरे याची किडनी प्रत्यारोपित करून घेतली. तसे कागदपत्र पवारच्या घरी सापडले आहेत. मात्र, पीडित अजय चावरे हा बेपत्ता असून, तो विनोद पवारच्या संपर्कात असल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयासमोर केला आहे.
बातम्या आणखी आहेत...