आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागील तीन वर्षांपासून उमा प्रकल्पाचे काम ठप्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - खारपाण पट्ट्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उमा बॅरेजचे काम तीन वर्षांपासून ठप्प झाले आहे, तर मागील सव्वा वर्षापासून केवळ दंडाची कपात सुरू आहे. प्रकल्पाचे काम ५० टक्के झाले असून, १६३ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना जमीन सिंचनाखाली आणता येणार आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास अपयश येत असताना दुसरीकडे तीन वर्षे लोटूनही या प्रकल्पाचे काम सुरू होण्याबाबत तोडगा निघालेला नाही. त्यामुळे या प्रकल्पाचा खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांना लाभ केव्हा मिळणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

खारपाणपट्ट्यातून पूर्णा नदी वाहते. पूर्णा नदीला मातीचे पठार असल्याने या नदीवर प्रकल्प उभारण्यासाठी अधिक पैसा खर्च करावा लागतो, तर जमिनीतील पाणी मिठासारखे खारे असल्याने या भागातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाव्यतिरिक्त पीक घेता येत नाही. त्यामुळे खारपाणपट्ट्याला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी पूर्णा नदीसह तिला जोडणाऱ्या विविध नद्यांवर साखळी पद्धतीने बॅरेज बांधले जात आहे. या सर्व बॅरेजला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यात उमा नदीवरील उमा बॅरेजचाही समावेश आहे. उमा बॅरेजला २००९ ला प्रशासकीय मंजुरी मिळाली. या प्रकल्पाची साठवण क्षमता २०.८० दशलक्षघनमीटर असून, पाच हजार ५१० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. आता प्रकल्पाची किंमत ८५० कोटी रुपयांवर गेली आहे. या प्रकल्पाचे काम ५० टक्के झाल्यानंतर २०१३ पासून कंत्राटदाराने कामबंद केले आहे. याबाबत कंत्राटदाराला वारंवार पत्र दिल्यानंतरही काम सुरू झाल्याने करारनाम्यानुसार नोव्हेंबर २०१४ पासून दररोज ५० हजार रुपये दंड आकारला जात आहे. त्यानंतरही काम सुरू झाल्याने नोव्हेंबर २०१५ पासून दररोज एक लाख रुपये दंड आकारला जात आहे. परंतु, अद्यापही प्रकल्पाचे काम कंत्राटदाराने सुरू केलेले नाही. त्यामुळे करारनाम्यानुसार संबंधित कंत्राटदाराकडून काम काढून नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे. या सर्व कार्यवाहीत अनेक वर्षे खर्च होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ज्या उद्दिष्टासाठी या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली, ते उद्दिष्ट नेमके केव्हा पूर्ण होणार? अशी चर्चाही या निमित्ताने सुरू आहे.

इतर प्रकल्पांचे कामही रखडले : उमाबॅरेजचे काम तीन वर्षांपासून रखडले असताना खारपाणपट्ट्यातील नेरधामणा बॅरेजचे काम ७० टक्के पूर्ण झाल्यावरही शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देण्यासाठी पाइपलाइन टाकण्याबाबत अद्यापही निविदा प्रक्रिया राबवली गेलेली नाही, तर नया अंदुरा प्रकल्पाचे काम ४५ टक्के पूर्ण झाले असून, सांडव्याच्या डिझाइनला मंजुरी मिळाल्याने तीन वर्षांपासून काम रखडले आहे.

वाईची कथाच न्यारी : वाई संग्राहक तलावाची घळभरणी जून २०१६ ला केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुलतानापूर गावाचे पूर्णत: पुनर्वसन नवले खरप येथे केले जाणार आहे. या ठिकाणी नागरी सुविधेची कामे सुरू झाली आहेत. संबंधितांना प्लॉटही वितरित करण्यात आले आहे. परंतु, अद्यापही पुनर्वसित नागरिकांनी घराच्या बांधकामाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे एकतर घळभरणी पुढे ढकलावी लागणार आहे. अथवा घळभरणी केल्यास सुलतानपूर गावाला पुराचा सामना करावा लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन मिशन दिलासाअंतर्गत या पुनर्वसितांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे, असे मत नाव छापण्याच्या अटीवर पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

केवळ वेळ खर्ची होणार
कंत्राटदाराकडूनकाम काढून घेतल्यानंतर पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया, प्रशासकीय मंजुरी यासाठी कागद काळे करावे लागणार आहे. यात केवळ वेळ खर्ची होणार आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात लक्ष घालून तोडगा काढावा, अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे.