आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद निवडणूक: सर्व गुपिते आज होतील उघड, युतीचे कोडेही उलगडणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस आहे. मंगळवारपर्यंत कोणत्याही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर सर्व गुपिते उघड होतील. युतीत ही जागा शिवसेनेला सुटली असली, तरी लढत दुरंगी की तिरंगी? ही बाबही स्पष्ट होणार आहे.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आठ जागांसाठी निवडणूक होत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटला. अकोल्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवारही निश्चित केला आहे, तर दुसरीकडे भाजप-सेना युतीत ही जागा शिवसेनेला सोडण्यात आल्याचे शिवसेनेकडून जाहीर होत असले, तरी भाजपकडून या वृत्ताचे खुले समर्थन अद्यापही झाले नाही. मंगळवारी रात्री युतीच्या वतीने जागा वाटपाची घोषणा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे कधी नव्हे, एवढी प्रचंड उत्सुकता ताणली गेली आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केल्याने ही उत्सुकता शिगेला पोहोचली होती. विशेष म्हणजे, वसंत खंडेलवाल गेल्या सहा महिन्यांपासून वरिष्ठ नेत्यांच्या परवानगीने कामालाही लागले होते. त्यामुळे अखेरच्या क्षणी अकोल्याच्या जागेबाबत कोणता निर्णय होणार? याकडे केवळ भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांचेच नव्हे, तर राजकारणात रस घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागले होते.

मंगळवारी कोणीही अर्ज दाखल केला नाही. आतापर्यंत २० उमेदवारांनी एकूण ५२ अर्ज खरेदी केले. यात अकोला, वाशीम आणि बुलडाण्यातील इच्छुकांचा समावेश आहे. मंगळवारी भाजपचे हरीश आलिमचंदानी, अशोक परळीकर (अपक्ष), विजयकुमार तोष्णीवाल (अपक्ष) यांनीही अर्ज खरेदी केले, तर आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे पक्षाचा एबी फॉर्मही आहे. परंतु, त्यांनीही मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. त्यामुळे बुधवारी खऱ्या अर्थाने लढतीचे चित्र स्पष्ट होईल.
बातम्या आणखी आहेत...