आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारी अर्ज कोण घेणार मागे; आज शेवटचा दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - विधान परिषदेच्या अकोला, वाशीम बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अर्ज दाखल केलेल्या पाचपैकी अपक्ष संजय आठवले यांनी अनामत रक्कम भरल्याने त्यांचा अर्ज बाद झाला. त्यामुळे आता चार उमेदवार कायम आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शनिवार हा अंतिम दिवस आहे. त्यामुळे चंद्रकांत ठाकरे, श्याम राठी हे उमेदवारी अर्ज मागे घेणार का? याबाबत उत्सुकता आहे.

आघाडी युतीत जागा वाटप तसेच उमेदवार कोण? याबाबत उत्सुकता ताणल्या गेली होती. अखेर भाजपने जागा वाटप मान्य केले, तर एक दिवस आधी आघाडीचे जागा वाटप जाहीर झाले होते. दोन्ही पक्षांमध्ये इच्छुक अधिक होते. मात्र, काँग्रेस आघाडीत वाशीमचे चंद्रकांत ठाकरे मलकापूरचे माजी नगराध्यक्ष श्याम राठी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या दोघांनाही उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली. आघाडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघेही उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. परंतु, तरीही कार्यकर्त्यांमध्ये मात्र उत्सुकता कायम आहे. कारण श्याम राठी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून प्रचारही सुरू केला होता. त्यामुळेच हे दोघेही उमेदवारी अर्ज मागे घेतात का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते दिल्लीला गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवारपासूनच खऱ्या अर्थाने प्रचार सुरू होणार आहे. आघाडीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून उत्सुकता निर्माण झाली असताना दुसरीकडे भाजप-सेना युतीच्या उमेदवाराने मात्र प्रचार सुरू केला आहे. थेट भेट त्याच बरोबर मेसेज, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनही संपर्क साधला जात आहे.
बातम्या आणखी आहेत...