आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : अकोल्‍यात विहिरीत पडला बिबट्या; 14 तासानंतर सुखरुप सुटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिबट्याला बाहेर काढण्‍यासाठी अशी कसरत करावी लागली. - Divya Marathi
बिबट्याला बाहेर काढण्‍यासाठी अशी कसरत करावी लागली.

अकोला - जिल्‍ह्यातील धाबा (ता. बार्शिटाकळी) गावापासून तीन किलोमीटर अंतरावरील निंबी शेतशिवारात शुक्रवारी रात्री विहिरीत पडलेल्या बिबट्याची काल (शनिवार) ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप सुटका करण्यात आली. विहिरीतून बाहेर पडलेल्या बिबट्याने त्याला पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीतूनच वाट काढली. गर्दीतून धूम ठोकणाऱ्या बिबट्याने जर हल्ला चढवला असता तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र, त्याने तसे न करता जंगलाच्या दिशेने पळ काढल्याने धोका टळला.
धाबा, निंबी, चेलका या परिसरात बऱ्यापैकी जंगल क्षेत्र आहे. डोंगराळ भाग व चांगल्या प्रमाणात वनराई असल्याने या भागात नीलगाय, काळवीट, रानडुकरांचा राबता असतो. तसेच याच भागात पाच ते सहा बिबट असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातीलच एक बिबट शुक्रवारी रात्रीच्या सुमारास नामदेव तिवाले गुरुजी यांच्या शेतातील उघड्या विहिरीत पडला. ही विहीर ८० फूट खोल असून, तिला २० फूट पाणी आहे. त्यामुळे बिबट्याला बऱ्याच काळापर्यंत पोहत आपले प्राण वाचवावे लागले. दरम्यान, सकाळी नामदेव तिवाले आपल्या शेतात पोहोचल्यानंतर त्यांना पहाटे सहा वाजता विहिरीत बिबट पडला असल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच वनरक्षक एस. आर. हातोले यांच्याशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. वनरक्षक एस. आर. हातोले, नामदेव तिवालेंसह काहीजण विहिरीजवळ पोहोचले. त्यांना विहिरीतील पाण्यात जीव वाचवण्यासाठी धडपड करणारा बिबट दिसून आला. वनरक्षक हातोले यांनी लगेच एक मोठे खोड दोरीच्या साहाय्याने विहिरीत सोडले. त्या खोडाच्या आधाराने बिबट्याने विहिरीत आश्रय घेतला. त्यानंतर लगेच त्यांनी वरिष्ठांना घटनेविषयी माहिती दिली. त्यानंतर गावातीलच नागरिकांनी बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घेतला. वनपाल डी. व्ही. सानप, वनरक्षक हातोलेंसह, मच्छिंद्र पारेकर, गणेश निमकंडे, एस. पी. चव्हाण, अरुण घुमसे, संतोष भोंडणे, दयाराम करवते, संजय तिवाले, उत्तमराव गोदमले, शैलेश करवते आदींनी दोरीच्या साहाय्याने एक बाज विहिरीत सोडली. विहिरीत बाज सोडल्यानंतर बिबट्याने बाजीचा सहारा घेतला. त्यानंतर गावकऱ्यांनी विहिरीवरील रहाटाच्या साहाय्याने बाज वर ओढली. अर्ध्या अंतरावर बाज येताच बिबट्याने तेथूनच विहिरीबाहेर उडी घेतली. बाहेर आल्यानंतर पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांमधून त्याने वाट काढत जंगलाच्या दिशेने पळ काढला. नागरिकांनीही बिबट वाचल्याचे समाधान व्यक्त करत आपापले घर गाठले.
पुढील स्‍लाइड्वर वाचा कोंबडीने दिला दगा...