आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारेकरी पती, सासू, सासऱ्याला जन्मठेप, जिल्हा सत्र न्यायालयाने दिला निकाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गर्भवतीला रॉकेल टाकून जाळल्याप्रकरणी तिचा पती, सासू आणि सासऱ्याला जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. १८ नोव्हेंबर २०१३ रोजी भौरद येथे ही हृदयद्रावक घटना घडली होती. घटनेच्या दुसऱ्या दिवसापासून तिघेही आरोपी कारागृहात होते.
आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या आम्रपाली हिचा सांभाळ केळीवेळी येथील तिचे मामा देवराव भटकर यांनी केला होता. ती विवाहयोग्य झाल्यानंतर ११ एप्रिल २०१३ रोजी तिच्या मामांनी भौरद येथील धम्मपाल जनार्दन वानखडे याच्याशी तिचे लग्न लावून दिले होते. काही दिवस संसार सुरळीत चालला. ती सात महिन्यांची गर्भवती असताना मामा भटकर यांनी रितीरिवाजानुसार साडी नेसवण्यासाठी तिला १५ नोव्हेंबर २०१३ रोजी केळीवेळी येथे नेले होते. त्या वेळी सोबत तिचा पतीही होता. दुसऱ्या दिवशी हे दाम्पत्य भौरद येथे परतले. नंतरच्या दोन दिवसांत त्यांच्यात वाद झाला. १८ नोव्हेंबर २०१३ रोजी सकाळी सासू अंजनाबाई जनार्दन वानखडे सासरा जनार्दन शालिग्राम वानखडे यांनी आम्रपालीला पाणी तापवण्यास सांगितले. "चहा पिल्यानंतर पाणी ठेवते', असे तिने सांगितल्याने त्यांच्यात वाद झाला. त्याचे रूपांतर दुपारी कडाक्याच्या भांडणात झाले. दुपारी दोन ते अडीच वाजतादरम्यान सासू सासऱ्याने घरातच तिच्या अंगावर रॉकेल ओतले आणि पती धम्मपाल याने तिला पेटवून दिले. त्यात ती ९८ टक्के भाजली. गावातील लोकांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. यादरम्यान कार्यकारी दंडाधिकारी ए. आर. भटकर यांनी तिचे मृत्यूपूर्व बयाण घेतले. त्यात तिने सासू-सासऱ्याने रॉकेल ओतून पतीने पेटवल्याचे सांगितले. त्यानंतर जुने शहर पोलिस ठाण्यात तिच्या मामाच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या ३०७, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक एस. के. फरकाडे यांनी केला. त्यांनाही तिने कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना दिलेल्या बयाणाप्रमाणेच बयाण दिले. त्यानंतर २१ नोव्हेंबर २०१३ रोजी तिचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी भादंविच्या ३०२ कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपींना दुसऱ्याच दिवशी अटक केली.

या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणात सात साक्षीदार तपासले. आरोपी पक्ष आणि सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. एन. तांबी यांच्या न्यायालयाने गुरुवारी आरोपी धम्मपाल जनार्दन वानखडे, सासरा जनार्दन शालिग्राम वानखडे सासू अंजनाबाई जनार्दन वानखडे यांना जन्मठेपेची शिक्षा एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड भरल्यास सहा महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील पी. पी. नागरे यांनी काम पाहिले.

वैद्यकीय अधिकाऱ्याच्या अहवालावर झाला युक्तिवाद : वैद्यकीयअधिकाऱ्यांनी आम्रपाली शुद्धीवर असल्याचा अहवाल दिला होता. या अहवालावर तिच्या पायाच्या अंगठ्याचे ठसे घेण्यात आले होते. मात्र, पायाच्या अंगठ्याच्या ठशांवर आम्रपालीचे नाव लिहिले नव्हते. यावर न्यायालयात युक्तिवाद झाला. त्यासाठी सरकारी वकील पी. पी. नागरे यांनी ११ प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आधार घेत युक्तिवाद केला होता.

कपड्यांना होता रॉकेलचा वास
पोलिसांनी तपास करून आम्रपालीच्या सासू-सासऱ्याचे कपडे जप्त केले होते. या कपड्यांना रॉकेलचा वास होता. हा पुरावा त्यांनीच रॉकेल ओतून जाळले हे सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचा ठरला. योग्य तपासामुळे दोन वर्षांच्या आतच या खटल्याचा निकाल लागला.

मृत्यूपूर्व बयाण ठरले महत्त्वाचे
कार्यकारी दंडाधिकारी ए. आर. भटकर यांनी घेतलेले मृत्यूपूर्व बयाण महत्त्वपूर्व पुरावा म्हणून ग्राह्य धरले. त्यानंतर तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक एस. के. फरकाडे यांनी केलेल्या तपासातूनही तोच निष्कर्ष निघाला. या दोघांनी नोंदवलेल्या पुराव्यात साधर्म्य असल्यामुळे आरोपींना शिक्षा देण्यासाठी पुरावे पुरेसे ठरले.