आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांमध्ये एसटीला बुलडाण्‍यात 80 लाखांचा फटका, बसस्‍थानकावर शुकशुकाट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या मुख्य मागणीसह इतर मागण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री पासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील सात आगारातील दोन हजार चालक, वाहक इतर संवर्गातील कर्मचारी सहभागी झाले आहेत.
 
दोन दिवसात या संपामुळे एसटी महामंडळ बुलडाणा विभागाचे ८० लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे खासगी प्रवाशांनी दिवाळी साजरी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे आणी दिवाळी साजरी करण्यासाठी गावी जाणे गरजेचे असल्याने अनेक प्रवाशांनी रेल्वेकडे धाव घेतली आहे. 
 
जिल्ह्यात दररोज एसटीच्या ३६०० फेऱ्या होवून त्या मधून जवळपास दिड लाख प्रवाशी प्रवास करतात. परंतु एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे या दाेन दिवसात शहरासह ग्रामीण भागातील एकाही रस्त्यावर बस धावली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील दळणवळणाची सेवा पूर्णता ठप्प पडली आहे. या संपामुळे दोनच दिवसात एसटी महामंडळाच्या बुलडाणा विभागाचे ८० लाख रुपये नुकसान झाले आहे. शिवाय या संपाचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसला आहे. या संपाची माहिती मिळाल्यामुळे अनेक प्रवाशांनी बसस्थानकाकडे पाठ फिरवून खासगी प्रवाशी वाहतुकीच्या बसस्थानकाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे महामंडळाच्या बसस्थानकावर एकच शुकशुकाट पसरला आहे. तर खासगी प्रवाशी थांब्यावर प्रवाशी एकच गर्दी करीत आहेत. याचाच फायदा खासगी प्रवाशी वाहतुकदारांनी घेवून भाड्यात वाढ केली आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी गावी जाणे गरजेचे असल्याने प्रवाशी देखील नाईलाजास्तव जास्तीचे भाडे देत आहेत. अनेक मार्गावरील काळी पिवळी, अॉटो, अॅपेरिक्षा इतर खासगी वाहने प्रवाशांनी खचाखच भरताना दिसून येत आहेत. दिवाळी झाल्यानंतर महिलांना भाऊबिजेचे वेध लागतात. कर्मचाऱ्यांसह प्रवाशांची हेळसांड थांबविण्यासाठी शासनाने या संपावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...