आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांवर वीज तोडणीची टांगती तलवार; रब्बीवर संकट, आजपासून कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देऊळ गावमही - आधीपासूनच विविध संकटांना तोंड देत असलेल्या शेतकऱ्यांवर आता वीज तोडणीची टांगती तलवार लटकत आहे. ज्या शेतकऱ्यांनी १५ नोव्हेंबरपर्यत कृषिपंपांचे थकित वीज बिल भरले नाही, अशा शेतकऱ्यांवर महावितरण कंपनीच्या वतीने १६ नोव्हेंबर पासून धडक कारवाई करण्यात येणार आहे. यावेळी शेतात जाऊन वीज पुरवठा बंद करून कनेक्शन तोडणीची कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईची धास्ती पसरली असून देऊळगावराजा तालुक्यातील हजार ७४६ शेतकरी महावितरण कंपनीच्या रडारवर आहेत. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांवर कारवाई केल्यास रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर दुष्काळजन्य परिस्थिती ओढवणार आहे.

 

वीज वितरण कंपनी आर्थिक दृष्ट्या डबघाईस आल्याने थकबाकी असलेल्या नागरिकांवर कारवाईच्या विचारात आहे. यामध्ये महावितरणची शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात वीज बिलाची थकबाकी आहे. अशा शेतकऱ्यांना महावितरणच्या वतीने अल्टिमेटम दिला असून १५ नोव्हेंबर २०१७ ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे १६ नोव्हेंबरपासून वीज कनेक्शन तोडणीला सुरुवात होणार आहे. वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असून दुष्काळी परिस्थितीत जगत असलेल्या शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याचे मोठे संकट ओढावणार आहे.

 

ज्या शेतकऱ्यांनी चालू वर्षातील एप्रिल, मे, जून या तीन महिन्याचे बिल भरले आहे. त्यांची वीज सुरू ठेऊन त्यांना कृषी संजीवनी योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र यावर्षी शेतकऱ्यांवर भीषण दुष्काळाचे सावट असुन परिसरात अत्यल्प पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच या मोठ्या आर्थिक परिस्थितीवर मात करून गहू, हरभरा, मका, रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली. मात्र देऊळगावराजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपलब्ध सिंचन क्षमतेनुसार कपाशी, तूर, हरभरा, गहू तसेच बागायती पिकांना पाणी देऊन पिके जगवत आहे. रब्बी हंगामातील अनेक शेतकऱ्यांची पिके पाना फुलात असून अनेकांचे ओलिती क्षेत्र भिजवणे सुरू आहे. महावितरण कंपनीने ऐन हंगामात ही वीज तोडणीची कारवाई केल्यास शेती पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. परिणामी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा बंद केल्यास शेतकरी वर्ग शासनाच्या आंदोलनाचा पवित्रा छेडणार आहे.

 

विजेचा लपंडाव सुरूच असतो
शेतीसाठी साधारणत: तास वीजपुरवठा सुरू असला तरी महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे वारंवार खंडित होतो. परिणामी शेतकऱ्यांना केवळ तीन ते चार तास वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे ओलिती क्षेत्र भिजत नसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
- भास्कर लाड, शेतकरी

 

.. तर शेतकरी आंदोलन छेडणार
शेतकरी सातत्याने अनेक वर्षांपासून दुष्काळजन्य परिस्थितीशी झगडत असुन मात्र ऐन रब्बी हंगामात वीज वितरण कंपनीच्या वीज पुरवठा बंद करण्याचा विरोधात समस्त शेतकरी रस्त्यावर उतरून महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन छेडणार आहे.
- ज्ञानदेव शिंगणे, शेतकरी

 

हातातोंडाशी आलेला घास जाणार
शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद केल्यास हाता तोंडाशी आलेली पिके पाणी दिल्यास करपणार तसेच अनेक शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पेरणी बाकी असुन पेरणीसाठी ओलिती क्षेत्र भिजवणे सुरू आहे. मात्र वीज पुरवठा खंडित केल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
- भगवान इंगळे, शेतकरी

 

शेतकऱ्यांनी तत्काळ थकित वीज बिल भरण्याच्या दिल्या होत्या सूचना
शासनाच्या आदेशाप्रमाणे१५ नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी थकीत वीज बिल भरून महावितरण कंपनीला सहकार्य करावे, अशाप्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अन्यथा शासनाच्या आदेशानुसार थकीत बिल असल्यास वीज पुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. परंतु तरीही बऱ्याच शेतकऱ्यांकडे कृषीपंपाचे वीज बिल थकित आहे. त्यामुळे नाइलाजास्तव वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई आम्हाला करावी लागत आहे.
- आर. बी. कायंदे, उपविभागीय अभियंता महावितरण, देऊळगावराजा.

 

बातम्या आणखी आहेत...