आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: गावकऱ्यांनी केले पाण्याच्या थेंबासोबत लग्न; अनोख्या कल्पनेतून जलसंवर्धनाचा संदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरा- अकोट तालुक्यातील उमरा गावाने सत्य मेव जयते, वॉटर कप स्पर्धा दोनमध्ये सहभाग घेतलेला आहे. गावातील तरुण वर्ग या निमित्ताने एकत्र येऊन स्पर्धेमध्ये करावयाच्या कामाचा नियोजनबद्ध आराखडा तयार करत आहेत. गावातील लोकांमध्ये जलजागृती निर्माण व्हावी, या हेतुने उमरा गावातील पाणी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अनोखी कल्पना राबवून गावामध्ये जल संवर्धनाची जागृृती केली. पाण्याच्या थेंबाचे गावासोबत लग्न लावले. 

पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब हा आपल्याच जमिनीत जिरवावा या हेतुने पाण्याचा थेंब अर्थात थेंबाचे प्रतिकात्मक चित्र काढून एका तरुणाच्या मुखवट्याला लावण्यात आला. त्या थेंबाला अर्थात त्या थेंब्या नवरदेवाला सजवलेल्या घोड्यावर बसवण्यात आले. त्यामागे सजवलेल्या बैलबंंडीमध्ये उमरा गावचे माय बाप सरपंच, सरपंच पत्नी वधुपित्याच्या वेशभुषेमध्ये बसले होते. 

आठवडी बाजार, ग्राम सचिवालयापासून ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत थेंबरूपी नवरदेवाची घोड्यावरून मिरवणुकीस सुरुवात झाली. घोड्यामागे गावातील महिला अक्षदा घेऊन वरातीमध्ये सामिल झाल्या होत्या. त्यामागे पुरुष वर्ग, तरुण वर्ग, मोठ्या प्रमाणात उत्साहाने सहभागी झाले. मिरवणुकीमध्ये जलसंवर्धनाचा जयघोष करण्यात आला. आपल्या लहान मुलांच्या भविष्यासाठी पाणी अडवा, पाणी जिरवा, आपल्या शेतीसाठी पाणी अडवा असा संदेश देण्यात आला. 

मिरवणुकीचा शेवट इंदिरानगर येथे गाव हे आपलं आपण सगळे मिळूण सुंदर करुया... या लहान मुलींनी गायिलेल्या गिताने करण्यात आला.उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच रवींद्र इंगळे, राजेंद्र मावलकार, तालुका पाणी समन्वयक नरेंद्र काकड, मनीष महल्ले, स्वप्नील इंगळे, विजय भगत, सचिन इंगळे, निर्मल ठाकुर, महेश सुकोशे, प्रशांत भगत, संदीप बेराड, निलेश इंगळे, सलीम चौधरी, मंजुषा इंगळे, निलीमा बेराड, सर्व आशा अंगणवाडी सेविका यांच्यासह गावातील महिला पुरुष यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. 

देवीला प्रार्थना 
गावाचे दैवत माँ दुर्गाच्या मंदिरात थेंब्याने नारळ फाेडून येणाऱ्या स्पर्धेच्या काळात प्रत्येक गावकऱ्याला श्रमदानाची शक्ती देवो, अशी प्रार्थना केली. नंतर संपूर्ण गावामध्ये मिरवणूक निघाली. मिरवणुकीदरम्यान गावातील पुरुष महिलांनी घोड्यावर बसलेल्या थेंबरूपी नवरदेवाला ओवाळण्या घातल्या. 
बातम्या आणखी आहेत...