आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mayor Along With Commissioner Take Lead For Electricity Grave Yard

महापौरांसह आयुक्तही घेणार शव दाहिनीसाठी पुढाकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पर्यावरणाच्यासंवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शव दाहिनीसाठी महापौर उज्ज्वला देशमुख, आयुक्त अजय लहाने यांनी आता पुढाकार घेतला आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासह प्रदूषणमुक्तीसाठी शहरातील स्मशानभूमीमध्ये शव दाहिनीची गरज आहे. यासाठी मोठा खर्च आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरातील दानशूर तसेच पर्यावरणप्रेमींनी शव दाहिनीसाठी पुढे यावे, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी शासनातर्फे तसेच पर्यावरणप्रेमींच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत. यात प्लास्टिक पिशवीमुक्तीपासून विविध उपक्रमांचा समावेश आहे. वृक्षारोपण उपक्रमही महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, विविध शाळा, सामाजिक मंडळे मोठ्या प्रमाणात राबवत आहेत. परंतु, त्या तुलनेने वृक्षांचे संवर्धन मात्र होत नाही. एकीकडे वृक्षांचे संवर्धन होत नसताना दुसरीकडे वृक्षांची कत्तल मात्र, मोठ्या प्रमाणात होत आहे. रोजच्या व्यवहारात लागणाऱ्या वस्तूंसाठीही जंगलातील लाकूड तोडण्याचे काम सुरू आहे. ग्रामीण भागात आजही लाकडावर स्वयंपाक केला जात आहे. एकीकडे या विविध कारणांसाठी वृक्षतोड करावी लागते, तर दुसरीकडे अंत्यसंस्कारासाठीही लाकडेच वापरावी लागतात. हजारो वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.
एका व्यक्तीमागे २०० ते २५० किलो लाकूड जाळले जाते. लाकूड जाळल्याने केवळ वृक्षांची कत्तलच होत नाही, तर दुसरीकडे लाकडे अर्धवट जळाल्यास त्यातील विषारी घटक वातावरणात मिसळतात. त्यामुळे प्रदूषणाचा सामनाही करावा लागतो. मोठ्या शहरांमध्ये आता लाकडाऐवजी शव दाहिनीचा वापर सुरू केला आहे. दुर्दैवाने अकोला शहरातील स्मशानभूमीत ही व्यवस्था उपलब्ध नाही. यासाठी दिव्य मराठीने महाअभियान राबवले आहे. दिव्य मराठीने घेतलेल्या या भूमिकेची दखल महापालिका प्रशासनाने घेतली आहे. विशेष म्हणजे महापौर, आयुक्त शव दाहिनीसाठी अनुकूल आहेत. परंतु, महापालिकेची आर्थिक स्थिती आणि शव दाहिनीसाठी येणारा खर्च लक्षात घेऊन या दोघांनीही शहरातील दानशूर, सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमींना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

विविध संघटनांनी पुढाकार घ्यावा
जंगलेकमी झाली आहेत, तर वृक्षांची संख्या कमी झाली आहे. भविष्यात अंत्यसंस्काराला लाकूड मिळेल की नाही? अशी समस्याही निर्माण होऊ शकते. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन ही कोणत्याही संस्थेची, व्यक्तीची जबाबदारी नाही. यासाठी सर्वच घटकांनी पुढे येणे गरजेचे आहे. शहरात तूर्तास एकही शव दाहिनी नाही. प्रत्येक स्मशानभूमीत शव दाहिनी असावी, अशी प्रशासनाची भूमिका आहे. परंतु, त्यासाठी लाखो रुपये खर्च येणार आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रतिष्ठित नागरिक, दानशूर व्यक्ती, विविध संस्था, संघटनांनी पुढे येण्याची गरज आहे. शव दाहिनीच्या व्यवस्थेसाठी सर्वाचा हातभार लागल्यास ही व्यवस्था शहरात उपलब्ध होऊ शकते. महापालिका आपल्या परीने निधी उभारण्याचा प्रयत्न करणार आहेच. परंतु, सर्वांचा हातभार लागणे महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन शव दाहिनीसाठी पुढे यावे, असे आवाहन आयुक्त अजय लहाने यांनी केले.

दानशूर व्यक्तींनी पुढे यावे
महापालिकाक्षेत्रात एकूण सात स्मशानभूमी आहेत. परंतु, एकाही स्मशानभूमीत शव दाहिनीची व्यवस्था नाही. शव दाहिनीची टप्प्या-टप्प्याने प्रत्येक स्मशानभूमीत व्यवस्था होणे गरजेची आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. शहराला दानशूर व्यक्तींचा इतिहास आहे. दानशूर व्यक्तींमुळेच शहराच्या वैभवात भर पडली आहे. सुंदराबाई खंडेलवाल टॉवर, भरतिया रुग्णालय, धर्मशाळा, मनपांच्या शाळा आदी अनेक गोष्टी केवळ दानशूर व्यक्तींमुळेच घडल्या आहेत. मनपा आपल्या स्तरावर अधिकाधिक निधीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करेन. पण पर्यावरणासाठी शव दाहिनीची गरज लक्षात घेता, शहरातील दानशूर व्यक्ती पुढे आल्यास ही समस्या निकाली निघू शकते. त्यामुळे शव दाहिनीसाठी दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन महापौर उज्ज्वला देशमुख यांनी केले.
किलो लाकूड एका मृतदेहामागे जळते.

परिणाम वापर का?
लाकूड जाळल्याने केवळ वृक्षांची कत्तलच होत नाही, तर दुसरीकडे लाकडे अर्धवट जळाल्यास त्यातील विषारी घटक वातावरणात मिसळतात. त्यामुळे प्रदूषण होते.