आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच; दावेदार संख्येत वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - भाजपला महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाल्याने तसेच महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने महापौरपदाच्या दावेदारांची संख्या वाढली आहे. तूर्तास या रस्सीखेच मध्ये विजय अग्रवाल, हरीश आलिमचंदानी, सुमनताई गावंडे, अजय शर्मा आणि गीतांजली शेगोकार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. दरम्यान आता पर्यंत दोन वेळा महिलेला संधी दिल्याने यावेळी महापौरपद पुरुषाकडे तर उपमहापौर पद महिलेला मिळु शकते. त्यामुळे खऱ्या अर्थाने महापौरपदासाठी पुरुषांमध्येच रस्सीखेच होऊ शकते. 
 
२००१ ला स्थापन झालेल्या महापालिकेत भाजपने साडेसात वर्षा सत्ता घेतली आहे. या साडेसात वर्षात भाजपचे तीन महापौर झाले. हे तिन्ही महापौर महिला होते. पहिल्या महापौर सुमनताई गावंडे, दुसऱ्या महापौर अश्विनीताई हातवळणे तर तिसऱ्या महापौर उज्ज्वला ताई देशमुख झाल्या. महापालिकेत भाजपला आता पर्यंत स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती हे पद इतर पक्षांनाही द्यावे लागले. मात्र यावेळी ही तिन्ही महत्वाची पदे त्याच बरोबर सभागृह नेता पद भाजपकडेच राहणार आहे. त्यामुळेच कोणतीही घोडे खरेदी करता भाजपला ही तिन्ही पदे मिळतील. परिणामी या पदांसाठी रस्सीखेच होईल. 
महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित निघाल्याने या पदावर खुल्या प्रवर्गातील व्यक्तीला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. विजय अग्रवाल हे खुल्या प्रवर्गात येतात. त्याच बरोबर दुसरे प्रबळ दावेदार हरीश आलिमचंदानी आहेत. यापूर्वी त्यांनी नगराध्यक्षपद भूषवले असून चारित्र्यवान नेता म्हणुन त्यांच्याकडे पाहिले जाते. त्याच बरोबर ते पाचवेळा नगरसेवक राहिले आहेत. तर स्वच्छ चारित्र्यासोबतच यापूर्वी विविध योजना आणणाऱ्या सुमनताई गावंडे या सुद्धा स्पर्धेत आहेत. तर विद्यमान सभागृह नेत्या गीतांजली शेगोकार यांचीही स्वच्छ प्रतिमा असल्याने त्या स्पर्धेत आहेत. तर माजी महापौर तथा कॉग्रेसचे माजी महानगराध्यक्ष मदन भरगड यांच्या विरुद्ध भाजपने उमद्या अजय शर्मा यांना मैदानात उतरवले होते. ही शर्यत अजय शर्मा यांनी जिंकल्याने ते सुद्धा या पदाचे दावेदार मानले जातात. दरम्यान आता पर्यंत भाजपने महापौरपद हे महिलेला दिल्याने यावेळी हे पद पुरुषाला मिळु शकते. त्यामुळे महापौरपद पुरुषाकडे तर उपमहापौर पद महिलेकडे जाऊ शकते. त्यामुळे विजय अग्रवाल, हरीश
आलिमचंदानी आणि अजय शर्मा यांच्यात महापौरपदासाठी रस्सीखेच होऊ शकते. 

त्याच बरोबर भाजपच्या ४८ पैकी २६ नगरसेविका निवडुन आल्या आहेत. तसेच यापूर्वी तीन वेळा महापौरपद महिलांना दिल्याने उपमहापौर पद महिलेला मिळु शकते. जर भाजपने उपमहापौर पद महिलेला देण्याचे निश्चित केल्यास गीतांजली शेगोकार, माधुरी बडोणे, सारिका जयस्वाल त्याच बरोबर आशिष पवित्रकार हे सुद्धा उपमहापौर पदाच्या स्पर्धेत आहेत. तर महापौर पदाचा उमेदवार निश्चित झाल्या नंतर महापौर आणि स्थायी समिती सभापती यांच्यात समन्वय राहणारा व्यक्ती स्थायी समिती सभापतीपदी निवड केल्या जाऊ शकते. त्यामुळे तूर्तास स्थायी समिती सभापतीपद कोणाला मिळेल? ही बाब गुलदस्त्यातच आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...