आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरांकडून ‘त्या’ गरीब व्यावसायिकांवर अन्याय, पठाण यांचा पत्रकार परिषदेत आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापौर उज्ज्वलाताई देशमुख यांनी ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर गरीब व्यावसायिकांवर अन्याय करणे सुरू केले आहे. तर, दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पाळता दाणा बाजारातील मोठ्या व्यावसायिकांना मात्र महापौर पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेता साजिदखान पठाण यांनी गुरुवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास पणत्या, फुले विकणाऱ्या गरीब व्यावसायिकांच्या सामानाची नासधूस करण्याचा घृणास्पद प्रकार केला. यामुळे गरीब व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून शहरातील प्रमुख गांधी मार्गावर जिल्ह्यातील लहान व्यावसायिक मातीचे दिवे, पणत्या, हार, फुले लक्ष्मीपूजनाचे साहित्य विक्रीसाठी रस्त्याच्या कडेला छोटी दुकाने थाटतात. नागरिकही मोठ्या संख्येने येथून साहित्याची खरेदी करत असतात. या छोट्या व्यावसायिकांमुळे कुणालाही त्रास झाला, अशी एकही तक्रार आतापर्यंत प्राप्त झाली नाही. शहरातील मुख्य वर्दळीच्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असून, वारंवार नगरसेवकांनी तक्रार देऊनही महापालिकेला हे अतिक्रमण हटवण्यात यश आले नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बाजाराचे स्थानांतरण करण्यास व्यावसायिकांकडून दिरंगाई केली जात आहे. भाजपने गल्ली ते दिल्लीपर्यंत हिंदुत्वाच्या नावावर सत्ता हस्तगत करून शहरातील श्रीमंत हिंदू व्यापाऱ्यांचे कायमचे अतिक्रमण ज्यापासून नागरिकांना त्रास होत आहे ते सोडून गरिबांची तात्पुरती दुकाने हटवण्याचा पराक्रम महापालिकेच्या पथकाने गुरुवारी दुपारी केला आहे. ही निंदनीय बाब आहे.
थोड्याफार साहित्याची विक्री करून मिळणाऱ्या पैशातून आपलीही दिवाळी साजरी होईल, अशी अपेक्षा गरीब व्यावसायिकांची आहे. किमान दिवाळी सण लक्षात घेता किरकोळ विक्रेत्यांना दुकाने लावून साहित्य विक्री करू द्यावी अन्यथा आंदोलनात्मक पावित्रा घेण्यात येईल, असा इशारा साजिदखान पठाण यांनी दिला आहे. बाजारातील मोठ्या व्यावसायिकांना महापौर पाठीशी घालत असल्याचा आरोपही पठाण यांनी केला.

आज महापालिका आयुक्तांशी चर्चा
गुरुवारीआयुक्त अजय लहाने कार्यालयीन कामानिमित्त बाहेरगावी होते. त्यामुळे त्यांच्याशी शुक्रवारी याप्रकरणी भेटून चर्चा करणार आहे. महापौर आयुक्तांना याबाबतचे पत्र देण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...