आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर अमावस्येला निघाला महासभेचा मुहूर्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अकोलेकरांनावेठीस धरणाऱ्या महासभेचा मुहूर्त अखेर अमावस्येला निघाला आहे. रस्ता काँक्रिटीकरणासह विविध विकासकामांचे प्रस्ताव असलेली ही सभा स्थगित केल्यापासून ५० व्या दिवशी म्हणजेच १६ जुलैला होत आहे. सत्ताधारी गटात वरकरणी मनोमिलन झालेले असले तरी अंत:करणातून मिलन झाेले की नाही? ही बाब या सभेत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या स्थगित महासभेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

भाजप-सेनेने सत्ता ताब्यात घेऊन ३०० पेक्षा अधिक दिवस झालेले आहेत. या कालावधीत सत्ताधारी गटाने आतापर्यंत केवळ सहा सभा घेतल्या. यापैकी एकाही सभेत ठोस निर्णय झाला नाही. परंतु, २७ मे रोजी बोलावलेल्या महासभेत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेतले जाणार होते. या सभेत एकूण दहा विषयांवर चर्चा केली जाणार होती. परंतु, स्थायी समिती अस्तित्वात आल्याने सत्ताधारी गटातील अंतर्गत वादामुळे ही सभा स्थगित करावी लागली. या सभेत इतिवृत्त कायम करण्यासोबतच रस्ता काँक्रिटीकरणाच्या अधिक दराने आलेल्या निविदांवर चर्चा करून निर्णय घेणे, जीआयएस प्रणाली लागू करणे, दैनिक परवाना शुल्क आकारणी करता आलेल्या निविदांवर चर्चा करणे, मोर्णा प्रकल्प ते महान जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन दहा टक्के लोकवर्गणी भरण्यास मंजुरी देणे, महापालिका क्षेत्रातील नळांना मीटर लावणे, शहरातील घनकचरा वाहतूक करणे, नेहरू पार्क येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी जागा मिळणे तसेच महापौरांच्या संमतीने वेळेवर येणाऱ्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. २७ मे रोजी ही सभा स्थगित झाल्याने हे सर्व महत्त्वपूर्ण विषय मागील ५० दिवसांपासून पेंडिंग पडले होते.

सभा होणार जम्बो
यासभेत मागील नऊ सभांचे इतिवृत्त वाचावयास लावल्यास तसेच विषय सोडून इतर विषयांवर चर्चा केल्यास ही सभा जम्बो ठरू शकते. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांची एकी राहिल्यास एखादवेळी काही विषयांवर चर्चा करून ही सभा पुन्हा स्थगितही होऊ शकते.

मित्रपक्षांचीही नाराजी
भाजप-सेनेनेसत्ता हस्तगत करताना राष्ट्रवादी काँग्रेसची साथ घेतली होती. परंतु, सत्ता घेतल्यानंतर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला फारसे महत्त्व दिले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनेही सत्ताधारी गटावर नाराजी व्यक्त केली आहे. तर, शिवसेना थेट नाराजी व्यक्त करत नसली तरी सभा होत नसल्याने नाराज आहे. या सभेत राष्ट्रवादी भाजपला साथ देणार की विरोधकांना, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...