आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिलासा’मुळे थांबल्या आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मागीलपाच वर्षांत जानेवारी महिन्यात सरासरी १२ ते १५ आत्महत्या झाल्या. मात्र, या वर्षात जानेवारीत चारच आत्महत्या झाल्या आहेत, असे सांगत मिशन दिलासाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे समुपदेशन केल्याची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी २१ जानेवारी रोजी न्यायालयाला दिली.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे पुनर्वसन करणाऱ्या मिशन दिलासा या उपक्रमाची दखल उच्च न्यायालयाने घेऊन मिशनची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. या वेळी त्यांनी न्यायालयासमाेर जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

अकोला जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमांची दखल घेत १८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांचे न्यायालयाने कौतुक केले होते. या वेळी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी मिशनमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे पुनर्वसन केल्याचे सांगितले होते. या मिशनच्या अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाने त्यांना गुरुवारी बोलावले होते. दुपारी न्यायाधीश पाटील सुकरे यांच्यासमक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी मिशन दिलासाची माहिती दिली. जवळपास ३५ मिनिटे न्यायालयात त्यांनी भूमिका मांडली. मिशन दिलासाअंतर्गत राबवण्यात येत असलेला दशसूत्री कार्यक्रम, चला आत्महत्यामुक्त करू या गाव, अधिकारी गाव दत्तक योजना, सामाजिक शैक्षणिक संघटनांनी केलेल्या अर्थसाहाय्याबाबत माहिती दिली. जलयुक्त शिवार, गावतलाव, नदी, नाल्यांचे गाळ काढून रुंदीकरण यामुळे संरक्षित जलसाठा वाढवण्यात मदत झाल्याचेही त्यांनी सांगितले. खरीप रब्बी हंगामात या पाण्याचा वापर शेतकऱ्यांनी करून उत्पादन वाढवले. मिशन दिलासासाठी १७ लाख रुपये जमा झाले आहेत. यातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येत असून, यात संघटनांसह माध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा उल्लेख त्यांनी केला. न्यायालयाने उपक्रमांचे कौतुक केले. या वेळी प्रा. संजय खडसे उपस्थित होते.