आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा रुग्णालयाची प्रकृती गंभीर, अशोकनगरातील रुग्णालयाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोटफैल अशोकनगरमध्ये महापालिकेच्या आयुर्वेद रुग्णालयाला ‘रुग्णालय’ म्हणावे का, असाच प्रश्न येथील अस्वच्छता, समाजकंटकांनी केलेली तोडफोड यावरुन पडतो. टीबी सारख्या रुग्णांवर ज्या ठिकाणी उपचार करण्यात येतात, तेथे हवे असलेले वातावरण नाही. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. रुग्णांच्या दृष्टीने रुग्णालयाची स्थिती तातडीने सुधारण्याची गरज आहे. 

या भागामध्ये आर्थिक दुर्बल घटकातील मोठ्या प्रमाणात राहतात त्यांना चांगला उपचार मिळावा यासाठी मनपाचे रुग्णालय कार्यरत आहे. रुग्णालयाला ५० वर्ष झालीत. परंतु सध्याची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. रुग्णालयाची संरक्षक भिंत तुटलेली, रुग्णालयाच्या आवारातच लोक घाण करतात. रुग्णालयाच्या आतील दरवाडे, खिडक्या यांची तावदाने फुटलेली. किमती वस्तू चोरीला गेल्या. दरवाजे, ग्रिल चोरांच्या तावडीतून वाचवण्यात यंत्रणेला यश आले. चोरांनी टेबल-खुर्च्या चोरुन नेल्या. सध्या चौकीदार आहे पण त्याची निवास व्यवस्था नसल्याने अन्यत्र राहावे लागते. त्यामुळे रात्री समाजकंटकांचा गोंधळ सुरू असतो. याची दखल मनपाच्या अधिकाऱ्यांनी घेण्याची गरज आहे. 

या रुग्णालयात दररोज ५०-६० रुग्ण तपासणीसाठी येतात. डिसेंबर महिन्यात १११५ रुग्णांची तपासणी केली. रुग्णालयात टीबीच्या रुग्णांवर डॉट्स पद्धतीने उपचार करण्यात येतो. आयुर्वेद रुग्णालय म्हणत असले तरी उपचार मात्र अॅलोपॅथीचे करण्यात येतात. खोकल्याची तपासणी करुन टीबीचा रुग्ण आहे का याची खातरजमा केली जाते. महागडी अौषधी कमी दरात उपलब्ध असली तरी रुग्णांना हवी असते ती लाल रंगाची सायरप. चांगल्या प्रकारचे अँटीबायोटिक्य आैषधे येथे उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली.डॉ. सैयद वासीकअली वैद्यकीय अधिकारी असून एक फार्मासिस्ट, एक चपराशी आणि एक स्वीपर रुग्णालयात कार्यरत आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञ करार पद्धतीवर कार्यरत आहे. रुग्णालयाच्या गच्चीवर दिवसाढवळ्या मुले खेळत असतात त्याचा कर्मचाऱ्यांना त्रास होतो. 

टीबीचे ८६ रुग्ण आढळले : २०१६मध्ये या भागात टीबीचे ८६ रुग्ण आढळले. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. डॉट्स पद्धतीने येथे उपचार केला जातो. गंभीर आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी रुग्णालयाची वास्तू, तेथील वातावरण चांगले असणे गरजेचे आहे. 
बातम्या आणखी आहेत...