आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखद साेमवार:पुरुषांसाठी अाता मोबाइल स्वच्छतागृह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अतिक्रमणामुळे कमी झालेले सार्वजनिक स्वच्छतागृहे, विविध कामांसाठी बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांचा प्रचंड लोंढा, यामुळे सार्वजनिक स्वच्छतागृहांचा मुद्दा तीव्र झाला आहे. शहरातील कोणत्याही मुख्य मार्गावर आता सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या बोटावर मोजण्या इतकी झाली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन माजी नगरसेवक नंदू ढोरे यांनी चालते-फिरते स्वच्छतागृह तयार केले आहे. या स्वच्छतागृहाचे लवकरच लोकार्पण केले जाणार आहे.

या चालता-फिरत्या स्वच्छतागृहाबाबत नंदू ढोरे म्हणाले की, शहराच्या सर्वच मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. विद्यार्थी विविध शिकवण्यांसाठी, ग्रामस्थ खरेदीसाठी, तर व्यावसायिक व्यवसायासाठी आणि मेडिकल कॉलेजमुळे उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या साडेचार लाख असली, तरी प्रत्यक्षात ही संख्या साडेसहा लाखांच्या वर जाते. पूर्वी प्रत्येक मुख्य मार्गावर स्वच्छतागृह होते. परंतु, आज दुर्दैवाने या स्वच्छतागृहांच्या जागांवर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे आता शहरात बोटावर मोजण्या इतके स्वच्छतागृहे राहिले आहेत. त्यामुळे बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांची कुचंबणा होते. त्यामुळे नागरिक जेथे आडोसा दिसेल, त्याठिकाणी आपला कार्यभाग आटोपून घेतात. यामुळे दुर्गंधी पसरते तसेच सार्वजनिक आरोग्यही धोक्यात येते. या सर्व बाबी लक्षात घेऊनच चालते-फिरते स्वच्छतागृह तयार केले आहे. यासाठी रीतसर प्रशासनाची परवानगी घेण्यात आली असून, या स्वच्छतागृहाचे लोकार्पण लवकरच केले जाणार आहे. लोकार्पण झाल्यानंतर या स्वच्छतागृहाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन नंदू ढोरे यांनी केले आहे.