आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआरपी टाळल्यास आता गमवावे लागणार लायसन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - छापील किमतीपेक्षा (एमआरपी) अधिक दराने बाटलीबंद पाणी किंवा इतर खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर थेट लायसन्स रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे. एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला असून, त्यातून प्रवाशांप्रति असलेली कटिबद्धता सिद्ध झाली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बहुतेक बसस्थानकांवर एमआरपीपेक्षा जास्त दराने वस्तूंची विक्री केली जात असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. विशेषत: बाटलीबंद पाणी आणि ब्रँडेड कंपनीचे वेफर्स, चिवडा, मूग डाळ, शेव आदी खाद्यपदार्थ चढ्या दराने विकले जातात. छापील किमतीचा आग्रह धरल्यास हॉकर्सच्या माध्यमातून अत्यंत मानहानिकारक प्रकार ओढवले जातात. महामंडळाच्या नव्या निर्णयामुळे अशा सर्व गैरप्रकारांना आळा बसणार असून, प्रवाशांनी तक्रार केल्यास त्याआधारे संबंधित हॉकर्सचे लायसन्स रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे. प्रवाशांमार्फत केल्या जाणाऱ्या या तक्रारींचा स्वीकार बसस्थानकप्रमुख करतील. शिवाय प्रत्येक बसस्थानकात उपलब्ध असलेल्या तक्रार सूचना वहीतही तक्रार नोंदवता येईल, असे एसटी प्रशासनाचे म्हणणे आहे.

प्रवाशांच्या सेवेसाठी प्रत्येक एसटी स्टँडवर उपाहार गृह, बुक स्टॉल, इतर चीज वस्तूंची दुकाने असतात. एसटी महामंडळाकडून रीतसर लायसन्स घेऊन अशी दुकाने उघडली जातात. त्यामुळे त्या दुकानांतून विक्री केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांसह इतर चीज वस्तूंच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी एसटीच्या अधिकाऱ्यांची आहे. मुळात लायसन्स देतानाच संबंधितांना तशा सूचना देऊन त्यांच्याकडून लेखी हमी घेतली जाते. परंतु, तरीही अनेक ठिकाणी अधिकतम किरकोळ मूल्यापेक्षा जास्त रक्कम घेऊन वस्तू खाद्य पदार्थांची विक्री केली जाते. नेमकी हीच बाब टाळण्यासाठी एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला असून, तसे निर्देश स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

वजनमापे विभागही व्हावा सतर्क : छापीलिकमतीपेक्षा अधिक रक्कम मागणाऱ्या हॉकर्सवर वजन मापे निरीक्षक विभागाचे अधिकारीही कारवाई करू शकतात. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष पुरवावे, अशी प्रवासी संघाची मागणी असून, मूर्तिजापूर बसस्थानकावर बाटलीबंद पाणी चढ्या दराने विकले जाते, याची तक्रारही त्यांच्याकडे पाठवली.

बसच्या आत विक्रीसही बंदी
^राज्यातील अनेक बसस्थानकांवर बसच्या आत प्रवेश घेऊन हॉकर्स त्यांच्याकडील खाद्यपदार्थांची विक्री करतात, अशी विक्री करण्याचे अधिकार कोणालाही देण्यात आले नाही. यामुळे प्रवाशांच्या प्रवासात व्यत्यय येतो. तो कटाक्षाने टाळला जाऊन अशा हॉकर्सवर कारवाई करायला पाहिजे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक फटका बसणार नाही. त्यांचे हित जपले जाईल. '' अॅड. राजेंद्र पांडे, माहितीअधिकार कार्यकर्ते

ध्वनिक्षेपकावरून उद््घोषणा
या निर्णयाची माहिती वेळोवेळी बसस्थानकांवरील ध्वनिक्षेपकाहून केली जाते. प्रवाशांना ही बाब माहीत व्हावी आणि त्यांनी तक्रारींसह पुढे यावे, यासाठीचा हा स्तुत्य प्रयत्न आहे. विशेष असे की, जिल्हास्तरावरील बसस्थानकांपासून ते तालुका पातळीवरील बसस्थानकांमधून ही उद्घोषणा सुरू आहे.