अकोला - गत २२ वर्षांपासून सेवेत असलेल्या महापालिकेच्या सात कला शिक्षकांना आयुक्त अजय लहाने यांनी तडकाफडकी निर्णय घेत १५ जून रोजी सेवेतून बडतर्फ केले आहे. निर्णयाने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
१९९४ ते १९९७ या कालावधीत कला शिक्षकांना महापालिकेत रुजू करून घेतले होते. टप्प्याटप्प्याने त्यांना मानसेवी म्हणून नियमित केले. मात्र, काही वर्षांतच पूर्व प्राथमिक शाळेत कला शिक्षकांची गरज नाही, असे म्हणून यापैकी दोघांना बडतर्फ केले होते. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर त्याचा निकाल २००१ मध्ये लागला होता. मात्र, निकाल शिक्षकांच्या बाजूने की महापालिका प्रशासनाच्या बाजूने, अशी संभ्रमावस्था निर्माण झाली होती. शिक्षक प्रशासन आपापल्या सोयीने याचा अर्थ लावत होते. शिक्षकांच्या मते हा निर्णय आपल्याच बाजूने लागला असल्याचा दावा करण्यात येत होता. २००१ पासून म्हणजेच १६ वर्षांपूर्वीपासून हे प्रकरण प्रलंबित होते. अचानक १५ जून रोजी या सातही कला शिक्षकांना आयुक्तांनी एका आदेशान्वये बडतर्फ केले. बडतर्फ केलेल्या कला शिक्षकांमध्ये सुनील केंगारकर, सुनील मेश्राम, वर्षा वानखडे, राजेश जाधव, राजेश जावरकर, संजय शेरेकर यांचा समावेश आहे. आयुक्तांनी केलेल्या या कारवाईने मनपा प्रशासनात खळबळ निर्माण झाली आहे.
कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न : गत२२ वर्षांपासून नोकरीत असलेल्या कला शिक्षकांनी वयोमर्यादा ओलांडली आहे. आता त्यांना दुसरीकडे शासकीय नोकरीचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे या कारवाईने एकप्रकारे त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.