आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका प्रशासन राबवणार प्लास्टिक निर्मूलन मोहीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पर्यावरणासाठी घातक नाल्या तुंबण्यास कारणीभूत ठरणाऱ्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी दर्जाच्या प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध दंडात्मक मोहीम राबवण्यात येणार आहे. याबाबत नेमका किती दंड आकारता येईल, याची माहिती प्रशासन घेत असून, लवकरच ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
आयुक्त अजय लहाने महापालिकेला जास्तीत जास्त वेळ देऊन कामाला गती देण्याचा प्रयत्न करत आहेत. अधिकाऱ्यांची पदे रिक्त असतानाही ते जातीने प्रत्येक कामावर लक्ष देत आहेत. एकाच वेळी विविध आघाड्यांवर काम करणाऱ्या आयुक्त लहाने यांनी शहराला प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. काही वर्षांपूर्वी महापालिका प्रशासनाने अशीच मोहीम राबवली होती. त्या वेळी या मोहिमेत सर्व कर्मचाऱ्यांना समाविष्ट केले होते. त्यामुळे ही मोहीम यशस्वी झाली होती. शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी दर्जाच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे. या पिशव्यांचा वापर करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकारही राज्य शासनाने मनपाला दिले आहे. मात्र, असे असतानाही ही मोहीम नियमितपणे राबवलेली िदसत नाही. त्यामुळेच शहरात व्यावसायिकांसह लघू व्यावसायिक, भाजी, फळ विक्रेते आदी सर्वच सर्रासपणे ५० मायक्रॉनपेक्षा कमी दर्जाच्या प्लास्टिक पिशव्या वापरतात. यामागे ग्राहक प्लास्टिक पिशव्यांची मागणी करतो, असे कारण सांगितले जाते. मात्र, या कमी दर्जाच्या प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाला हानी पोहोचत असून, शहरातील लहान-मोठे नालेही चोक-अप होण्याचे प्रकार घडतात. थोडा पाऊस झाला, तरी नाल्यातील पाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळेच प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी दर्जाच्या प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यावर जास्तीत किती दंड आकारता येईल, याबाबत माहिती घेतली जात असून, या मोहिमेत सर्वच कर्मचाऱ्यांना कसे सहभागी करून घेता येईल, याचा विचारही प्रशासन करत आहे. येत्या काही दिवसांत शहरात ही मोहीम राबवली जाणार आहे.

प्लास्टिकचा वापर टाळावा
^सर्व व्यावसायिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा. मोहीमेदरम्यान ५० मायक्रॉनपेक्षा कमी दर्जाच्या पिशव्या आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल. तसेच नागरिकांनीही बाजारात येताना कापडी पिशवीचा वापर करावा. '' अजय लहाने, आयुक्त,मनपा

बातम्या आणखी आहेत...