आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराला अजूनही सक्षम अधिकाऱ्यांची प्रतीक्षाच; उपायुक्तांसह अनेक महत्त्वाची पदे रिक्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका आयुक्त सोमनाथ शेटे यांच्या बदलीसह ते दीर्घ रजेवर जाणार, याबाबत महापालिका वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे महापालिकेला अद्यापही अधिकाऱ्यांची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

महापालिकेत उपायुक्तांसह अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यात आयुक्तांची प्रशासनावरील पकड सैल झाल्याने महापालिकेचे कामकाज ढेपाळले आहे. एकीकडे रिक्तपदे अद्यापही भरली नसताना मागील महिन्यात आयुक्तांच्या बदलीबाबत जोरदार चर्चा सुरू होती. परंतु, अधिवेशन सुरू झाल्याने आता बदली होणार नाही? असा तर्कही लावण्यात आला. आता पुन्हा एकदा आयुक्त सोमनाथ शेटे यांच्या बदलीबाबत चर्चा सुरू आहे. आयुक्त सोमनाथ शेटे तूर्तास रजेवर गेले नसले, तरी मुंबईला आहेत. आयुक्त आता मुंबई मुक्कामीच आपली बदली करून घेतील, तसेच बदली झाल्यास दीर्घ रजेवर जातील, अशी जोरदार चर्चा मनपात सुरू आहे. आयुक्तांची बदली झाल्यास अथवा ते दीर्घ रजेवर गेल्यास महापालिकेचे कामकाज पुन्हा कोलमडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अधिकाऱ्यांची वानवा असलेल्या मनपात विद्यमान अधिकाऱ्यांमध्ये वादविवाद सुरू आहेत. त्यामुळे आयुक्त दीर्घ रजेवर गेल्यास अथवा बदली झाल्यास मनपाचा आखाडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तुझा गळा, माझा गळा, गुंफू मोत्यांच्या माळा
सूत्रांच्या माहितीनुसार सक्षम अधिकारी कुणालाच नको आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये गटा-तटाचे राजकारण सुरू असल्याचे चित्र असले, तरी आतून मात्र ‘तुझा गळा, माझा गळा गुंफू मोत्यांच्या माळा’ अशी परिस्थिती असल्याचे बोलले जाते, तर काही नगरसेवकांनी सक्षम अधिकाऱ्यांची मागणी आपल्या नेत्यांकडे केली. परंतु, मनपा निवडणुकीत उमेदवारी हवी की नको? असा प्रतिप्रश्न उपस्थित करून सक्षम अधिकाऱ्यांची मागणी करणाऱ्या नगरसेवकांची गळचेपी केली जात आहे.

भरती तर नाहीच उलट बदल्या
भाजपचीसत्ता येऊन दहा महिन्यांचा कालावधी होत आहे. मंत्रिमंडळात जिल्ह्याला स्थान मिळाल्याने किमान चांगले अधिकारी नियुक्त केले जातील, अशी आशा होती, तर भाजपचे नेते, आमदार, मंत्री यांनीही अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आश्वासन दिले होते. परंतु, महापालिकेला एकही अधिकारी मिळालेला नाही. या उलट सक्षम अधिकाऱ्यांच्या बदल्या मात्र शासनाने केल्या. डॉ. महेंद्र कल्याणकर, दयानंद चिंचोलीकर या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या.