आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला मनपात राडा, सभागृह बनले आखाडा; आरोप प्रत्यारोपाच्या फैरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महिला बचत गटांना देण्यात आलेले खिचडीचे कंत्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारणे आणि प्रत्येक नगरसेवकांना समान निधीचे वाटप करण्याच्या मुद्द्यांवर शुक्रवारी महापालिकेच्या सभागृहात चांगलाच राडा झाला. या वेळी उपमहापौरांनी एकेरी भाषेचा वापर केल्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांना सभागृहातच पाहून घेण्याची धमकी दिली. त्यामुळे शहर विकासाचे मुद्दे बाजूला पडून सभागृहाला आखाड्याचे स्वरूप आले होते.
शहरविकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी महासभेचे अायाेजन करण्यात अाले हाेते.

या सभेमध्ये १६ महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा हाेणार होती. मात्र, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्येच ‘तूतू-मैमै’ झाल्यामुळे सभा गदारोळातच स्थगित करण्यात आली. सभा सुरू होण्यापूर्वी महिला बचत गटाच्या महिला आणि अण्णाभाऊ साठे पुतळा निर्मितीच्या मंजुरीसाठी नागरिक सभागृहात सकाळी ११ वाजताच दाखल झाले होते. सभा सुरू झाल्यानंतर विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वात अालेल्या महिला आणि नागरिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. गेल्या महिनाभरापूर्वीच महिला बचत गटांना देण्यात आलेले कंत्राट सत्ताधारी रद्द करणार असल्यामुळे त्याला बचत गटाच्या महिलांनी विरोध केला, तरीही कंत्राट रद्द होणार असल्याची भाषा महापाैरांनी केल्यामुळे सभेत गाेंधळ सुरू झाला. त्यानंतर साजिदखान पठाण आणि उपमहापौर विनोद मापारी यांच्यामध्ये हमरीतुमरी झाल्यामुळे सभागृहातील वातावरण संतप्त झाले होते. उपमहापौर हे बचत गटांच्या महिलांना आवाहन करत असताना या वेळी साजिद खान पठाण यांनी बोलणे सुरू केले. त्यानंतर मापारी आणि पठाण दाेघेही एकेरी भाषेवर आल्यानंतर यांच्यात लोटपाट झाली.

पोलिसांनी घेतला हातात माइक
सभागृहातीलपरिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे सभागृहात पोलिस दाखल झाले. या वेळी सिटी कोतवाली पोलिस ठाण्याचे ठाणेदार अनिरुद्ध अढाव यांनी शांतता ठेवण्याचे आवाहन केले. मात्र, परिस्थिती आणखीनच चिघळल्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी चक्क माइक हातात घेऊन बाहेरच्या लोकांना सभागृहातून बाहेर जाण्याचे आदेश दिले. तसेच सभागृहात असलेल्या इतर लोकांना बाहेर पाठवण्याबाबत विरोधी पक्षनेता साजिदखान पठाण यांना प्रदीप चव्हाण यांनी सांगितल्यानंतर नागरिक बाहेर गेले.

आयुक्त म्हणतात "कंत्राट बदलणार नाही'
आयुक्तसोमनाथ शेटे यांनी महिला बचत गटांच्या महिलांना म्हटले की, सभागृहातील आंदोलन थांबवा, खिचडीचे कंत्राटाचा मुद्दा आता न्यायालयात गेल्यामुळे त्यात कोणीही बदल करू शकत नाही. तुम्हाला देण्यात आलेले कंत्राटच कायम राहतील.

महापौर म्हणतात "कंत्राट बदलणार'
कंत्राट नियमबाह्य आहेत. उपायुक्त माधुरी मडावी, शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांनी मनमानी पद्धतीने कंत्राट दिले आहेत. त्यामुळे हे कंत्राट बदलण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे महापौर उज्ज्वला देशमुख यांनी सांगितले.

उपमहापौर म्हणतात "माझ्यावर हात उगारला'
विरोधीपक्षनेत्यांनी आपल्यावर हात उचलला. मात्र, मी वर असल्यामुळे तो हात माझ्यापर्यंत आला नाही. त्यांचे वागणे हे लोकशाहीला शोभणारे नाही, असे उपमहापौर विनोद मापारी यांनी सांगितले.

नगरसेवक म्हणतात "कंत्राट दिलेच कसे'
आयुक्तांचे आदेश नसताना उपायुक्तांनी खिचडीचे कंत्राट दिलेच कसे. आम्ही विरोधीपक्षाला समन्वयाच्या बैठकीला बोलावणार नाही, असे नगरसेवक विजय अग्रवाल म्हणाले.

विरोधी पक्षनेते म्हणतात "एकेरी शब्दप्रयोग'
शांततेच्या मार्गाने मागण्या करत हाेताे. मात्र, उपमहापौरांनी एकेरी भाषा वापरली. त्यांनी जातिवाचक शब्द उच्चारला ते चुकीचे होते, असे विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण यांनी सांगितले.

"कंत्राट बदल नाही'
या वेळी हरीशभाई आलिमचंदानी यांनी खिचडीचा कंत्राट कायम राहणार असल्याचे सांगितले, तर भाजपच्या नगरसेवकांनीसुद्धा कंत्राट कायम राहणार असल्यामुळे गदारोळ करण्याचे गटांना आवाहन केले होते.
सभागृहात खिचडी
३४बचत गटांना खिचडी बनवण्याचे कंत्राट देण्यात आले. हे कंत्राट आयुक्त, शिक्षणाधिकारी आणि उपायुक्तांच्या प्रशासकीय समितीने दिले. त्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या बचत गटांना कंत्राट मिळाल्यामुळे सत्ताधारी नाराज आहेत. त्यामुळे हे कंत्राटच रद्द करण्याचा डाव असल्याचे बचत गटांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी आज सभागृहात ठिय्या दिला. बचत गटांच्या महिलांचे नेतृत्व करणाऱ्या वंदना वासनिक यांनी चक्क सभागृहातच खिचडी आणून महापौरांच्या आसनाच्या दिशेने फेकली.

महापौरांच्या दिशेने भिरकावली चप्पल
सभागृहातगाेंधळ सुरू झाल्यानंतर महापौर त्यांच्या दालनामध्ये जाण्यासाठी निघाल्या. मात्र, आपल्या प्रश्नाचे उत्तर देता महापौर जातात म्हणून महापौरांच्या आसनाच्या दिशेने चप्पल भिरकावण्यात आली. मात्र, ती सुदैवाने कुणालाही लागली नाही. तसेच गदारोळात विरोधी पक्षाचे सदस्य महापौरांच्या आसनाजवळ येऊन त्यांनी राजदंड पळवला. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्येच ‘तू तू-मै मै’ झाल्यामुळे महापालिकेची महासभा गदारोळातच स्थगित करण्यात आली.

गदारोळ कशावरून
1.३४ बचतगटांना खिचडीचे कंत्राट देण्यात आले. त्यात महापौरांनी सुचवलेल्या गटांचा समावेश झाला नाही.
2.खुलेनाट्यगृहाच्या मागील पाडलेलीदुकाने पुन्हा त्याच व्यावसायिकांना देण्याचा प्रयत्न होतोय, त्यासाठी मोठ्या रकमा घेण्यात येत आहेत, असा आरोप विरोधकांनी केला.
3.गेल्या महासभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला मंजुरी देण्यात आली. मात्र, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला मंजुरी दिली नाही.
4.मजीप्रासाठी आलेला ११ कोटी ८४ लाख रुपयांच्या निधीचे वाटप समसमान व्हावे. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून ६०/४० टक्क्यांचा प्रस्ताव विरोधकांना मान्य नाही.