आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाता महापालिकेतील पदोन्नती प्रकरणांची होणार पोलखोल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महापालिकेत झालेली सर्वच पदोन्नती प्रकरणे वादग्रस्त नसली, तरी काही प्रकरणे वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. याअनुषंगाने प्रशासनाने पदोन्नती प्रकरणात लक्ष घातले असून, एक-एक पदोन्नती प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर पदोन्नती प्रकरणांची पोलखोल होण्याची शक्यता आहे.
महापालिकेत मागील पाच ते आठ वर्षांत, तर त्यापूर्वी काही कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली होती. यांपैकी आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर पदोन्नती प्रकरणाचा एकत्रित निपटाराही केला होता. आतापर्यंत या पदोन्नती प्रकरणांबाबत आलेल्या कोणत्याही आयुक्तांनी फारसे लक्ष दिले नाही. परंतु, विद्यमान आयुक्त अजय लहाने यांनी महापालिकेतील मंजूर रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. याअनुषंगानेच आकृतिबंध बिंदू नामावली तयार करण्याचे काम सुरू आहे.
आयुक्तांचा बिंदू नामावलीबाबत चांगला अभ्यास असल्याने ते जातीने तपासणी करणार आहेत, तर दुसरीकडे काही पदोन्नती प्रकरणांकडे त्यांचे लक्ष काही अधिकाऱ्यांची ‘परीक्षा’ घेतल्याने वळले आहे. अधिकाऱ्यांना साधे लिहिता वाचता येत नसल्याची बाब उघड झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांना पदोन्नती कशी मिळाली? याचा अभ्यास त्यांनी सुरू केला आहे.
एकीकडे आयुक्तांनी अशा प्रकरणांचा अभ्यास सुरू केला असताना दुसरीकडे आयुक्तांना काही नागरिकांनी माहिती अधिकारांतर्गत पदोन्नती प्रकरणातील मागितलेली माहिती टपालाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे आयुक्तांकडे काही पदोन्नती प्रकरणातील सर्व कागदपत्रे प्राप्त झाली आहेत. या कागदपत्रांचा अभ्यास तूर्तास सुरू असून, टप्प्याटप्प्याने काही पदोन्नती प्रकरणांचा भंडाफोड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
बातम्या आणखी आहेत...