आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रमोशन सोडा, पण अकोला महापालिकेत बदली टाळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेच्या‘कु’कीर्तीचा झटका पुन्हा एकदा शहराला बसला आहे. नगररचनाकारपदी नुकतीच बदली झालेल्या अहमदननगर येथील स. च. बारगड यांनी प्रमोशन सोडा, पण बदली टाळा, अशी विनंती करून महापालिकेत झालेली बदली नाकारली आहे. त्यामुळे महापालिकेतील नगररचनाकाराचे पद पुन्हा रिक्त झाले आहे.

महापालिका विविध कारणांनी राज्यभर चर्चेत असते. त्यातल्या त्यात मंत्रालयात महापालिकेतील घडामोडी तिखट, मीठ लावून सांगितल्या जातात. त्यामुळे कोणताही अधिकारी महापालिकेत बदली झाल्यास बदली रद्द करण्याच्या मागे लागतो अथवा रुजू होत नाही. ही बाब केवळ आयुक्त, उपायुक्तांपुरतीच मर्यादित नाही, तर नगररचनाकारसारख्या महत्त्वाच्या पदावरील अधिकारीही महापालिकेत रुजू होण्यास तयार नाहीत. केवळ दोन नगररचनाकार वगळता १५ वर्षांच्या कालावधीत अनेकांनी नाखुशीने पदभार सांभाळला आहे. २००१ ला महापालिका अस्तित्वात आली, तेव्हा मुकुंद तट्टे हे कायमस्वरूपी नगररचनाकार महापालिकेला मिळाले. दोन वर्षांत त्यांची बदली झाली. त्यांच्या जागी शंकरराव चव्हाण हे कायमस्वरूपी नगररचनाकार महापालिकेला मिळाले. परंतु, काही दिवसात त्यांची बदली झाली आणि मुकुंद तट्टे यांची नगररचनाकार म्हणून नियुक्ती झाली. जवळपास २०१० पर्यंत मुकुंद तट्टे हेच नगररचनाकार होते. त्यानंतर नगररचनाकाराचा प्रभार जिल्ह्यातील अथवा इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडे देण्यात आला, तर २०१२ मध्ये महापालिकेला पुन्हा कायमस्वरूपी नगररचनाकार मिळाले. मात्र, काही दिवसातच त्यांनीही बदली मागितली. बदली मिळाल्याने त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. तेव्हापासून महापालिकेला कायमस्वरूपी नगररचनाकार नाहीत. त्यामुळे नगररचना विभागाचे कामकाज ढेपाळले आहे. २०१२ पासून प्रभारी नगररचनाकाराच्या माध्यमातून काम सुरू होते. कायमस्वरूपी नगररचनाकार म्हणून येण्यास कोणताही अधिकारी तयार नाही. ही बाब लक्षात घेऊन अहमदनगर येथील सहायक नगररचनाकार स. च. बारगड यांना नगररचनाकारपदी बढती देऊन अकोला महापालिकेत त्यांची बदली केली. १० जुलैला त्यांची बदली झाली. तसा आदेशही महापालिकेत धडकला. त्यामुळे बुलडाणा येथील विजय इखार यांनी पदभार सोडला. परंतु, १० जुलैला रुजू होणारे स. च. बारगड हे महापालिकेत रुजू झालेच नाहीत. त्यांनी त्यांच्या पुणे येथील केंद्रीय कार्यालयाला बढती नको असल्याचे विनम्रपणे कळवून अकोला येथे झालेली बदली टाळली. त्यामुळे आता पुन्हा नगररचनाकार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुकुंदतट्टेंना जमले इतरांना का नाही? : महापालिकेतकाम करता येत नाही, महापालिकेत हस्तक्षेप होतो, असे वारंवार म्हटल्या जाते. परंतु, लक्ष्मीकांत देशमुख, चंद्रशेखर रोकडे, डॉ. विपीन शर्मा, डॉ. महेंद्र कल्याणकर तसेच उपायुक्त वैभव आवारे, दयानंद चिंचोलीकर या अधिकाऱ्यांनी महापालिकेत यशस्वीरीत्या काम केले आहे. त्याचप्रमाणे मुकुंद तट्टे यांनी अनेक वर्ष पूर्णवेळ नगररचनाकार म्हणून महापालिकेचे कामकाज पाहिले. एकीकडे नगररचनाकार आणि दुसरीकडे उपायुक्तांचा प्रभार अशा दोन जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या, तर शंकरराव चव्हाण यांनी कोणतीही तक्रार करता पूर्णवेळ नगररचनाकार म्हणून काम केले आहे. त्यामुळेच जे मुकुंद तट्टे यांना जमले ते इतर अधिकाऱ्यांना का जमत नाही? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

"सहायकसंचालक'साठी नाही पुढाकार : महापालिकेतनगररचनाकाराचेच पद रिक्त नसून सहायक संचालक नगररचनाकार हे अत्यंत महत्त्वाचे पदही रिक्त आहे. सहायक संचालक नगररचनाकार पद मंजूर असताना आणि महापालिका अस्तित्वात येऊन १५ वर्षांचा कालावधी झाला असताना अद्यापही हे पद भरलेले नाही. सहायक संचालक नगररचनाकाराची नियुक्ती झाल्यास आयुक्तांना या विभागाकडे फारसे लक्ष देण्याची गरज राहणार नाही. परंतु, यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीने पुढाकार घेतलेला नाही.

१२ अधिकाऱ्यांकडे प्रभार
१५वर्षांत पूर्णवेळ नगररचनाकार केवळ तीनच मिळाले. त्यामुळे अनेक वेळा या पदाचा प्रभार सहायक नगररचनाकारांवर सोपवण्यात आला. अनेक सहायक नगररचनाकारांनी आपल्या मुख्य नियुक्तीच्या गावातूनच कामकाज पाहिले. त्यामुळे आतापर्यंत नगररचनापदाचा बारा अधिकाऱ्यांकडे प्रभार सोपवावा लागला. यात अरविंद देशमुख, दीपक नागेकर, चारुदत्त कुलट, दीपक हिंगासपुरे, संजय साबळे, दांदळे, राजपूत, खेर्डे, मुकुंद बुटे, गिरीश अग्रवाल, विजय इखार यांचा समावेश आहे.

अजब किस्से
इतरजिल्ह्यातील सहायक नगररचनाकारांनी नगररचनाकाराचा प्रभार घेण्यास टाळाटाळ केली. कायमस्वरूपी नगररचनाकारांनीही ठाम नकार दिला. किशोर भुंडोकार यांची पाच जुलै २०१२ ला नगररचनाकारपदी बदली झाली. त्यांनी बदलीनंतर आठ दिवसात उच्च शिक्षणासाठी रजा मागितली. ही रजा नामंजूर झाल्याने अखेर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. परंतु, काम करण्यास नकार दिला.

कामकाज रखडणार
नगररचनाविभाग अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. सर्वसामान्यांच्या घराच्या बांधकामास परवानगी देण्याचे काम या विभागामार्फत केले जाते. आतापर्यंत अनेकदा पूर्णवेळ नगररचनाकार नसल्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात स्वप्नातील घरासाठी पाणी आले. त्यामुळे आता पुन्हा नगररचनाकार पद रिक्त असल्याने बांधकामाची प्रकरणे रखडण्याची शक्यता नाकारता येत नाही.