आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेत २४ टक्के नगरसेवक ‘मौनीबाबा’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेच्या पाच वर्षांच्या कार्यकाळाला आता जेमतेम साडेतीन महिने उरले आहेत. या पावणे चार वर्षांच्या कालावधीत झालेल्या विविध सर्व साधारण सभेत ७६ नगरसेवकांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले. कधी प्रशासनाला तर कधी सत्ताधारी गटाला धारेवर धरले, तर २४ टक्के नगरसेवकांनी सभागृहात एकदाही आपले मत व्यक्त केले नाही. परिणामी महापालिकेतील ७८ पैकी २४ टक्के नगरसेवक तूर्तास मौनीबाबा ठरले आहेत. महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या २४ टक्क्यांपैकी किती टक्के नगरसेवक मौनीबाबाच्या भूमिकेतून बाहेर येतात? ही बाब येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
महापालिका अधिनियमानुसार दर महिन्याला एक सर्वसाधारण सभा घेतली जाते. एखादवेळी एका महिन्यात दोन सभा घेतल्या जातात तर कधी-कधी दोन ते तीन महिने सभाच घेतली जात नाही. महापालिकेत सर्वसाधारण सभा म्हणजेच सभागृह सर्वोच्च आहे. त्यामुळेच सभागृहात धोरणात्मक विषयांवर चर्चा केली जाते. धोरणात्मक विषयांसोबत इतर सर्वसामान्य विषयांवरही सभागृहात चर्चा करून निर्णय घेतला जातो. त्यामुळे सर्वसाधारणपणे जवळपास सर्वच नगरसेवक सभागृहात होणाऱ्या चर्चेत आपले मत व्यक्त करतात. जेणे करून चर्चा सर्व समावेशक व्हावी. परंतु, निवडून आलेल्या प्रत्येकाकडे वक्तृत्व गुण असतो असे नाही. तसेच वक्तृत्व गुण असलाच पाहिजे, असेही नाही. परंतु, संबंधित विषयावर मात्र आपले मत मांडणे हे नगरसेवकाचे कर्तव्य असते.
महापालिकेत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाल्याने पहिले अडीच वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्याने भारिप-बमसंने सत्ता चालवली तर नंतरच्या अडीच वर्षांत भाजप-सेनेने सत्ता हस्तगत केली. त्यामुळे या पाच वर्षांच्या कालावधीत सर्वच पक्षांना सत्तेची संधी मिळाली. आतापर्यंत पावणे पाच वर्षांच्या कार्यकाळात ५० च्या जवळपास सर्वसाधारण सभा झाल्या. सर्वाधिक सभा या भारिप-बमसंच्या कार्यकाळात झालेल्या आहेत. राहिलेल्या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत भाजप-सेना यांनाही अधिक सभा घेण्याची संधी आहे. त्यामुळेच या राहिलेल्या साडेतीन महिन्यांच्या कार्यकाळातमौनीबाबा नगरसेवक आपले मौनव्रत तोडणार का? याबाबत उत्सुकता लागली आहे.
सर्वाधिक बोलणारे नगरसेवक
सभागृहात चर्चेदरम्यान सभागृहाचा सर्वाधिक वेळ अपक्ष नगरसेवक सुनील मेश्राम, भाजपचे विजय अग्रवाल, भारिप-बमसंचे गजानन गवई आणि काँग्रेसचे मदन भरगड यांनी घेतला आहे.
काँग्रेस-अपक्षांचे प्रमाण अधिक
मौनीबाबा नगरसेवकांमध्ये ज्या प्रमाणे महिलांचे प्रमाण अधिक आहे. त्याच प्रमाणे पक्षनिहाय विचार करता काँग्रेस आणि अपक्ष नगरसेवकांचेही प्रमाण अधिक आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या जवळपास सर्वच नगरसेवकांनी सभागृहात आपले मत मांडले आहे.
स्विकृतही मौनीबाबा
सामाजिक कार्यकर्ते, सखोल अभ्यासंूची निवड स्विकृत नगरसेवक म्हणून होते. परंतु, काही वर्षांपासून त्यांच्या निवडीची पद्धत बदलली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यालाच ही संधी दिली जाते. महापालिकेत पाच स्विकृत नगरसेवक आहेत. या पाच स्विकृत नगरसेवकांपैकी ४० टक्के नगरसेवक मौनीबाबा ठरले आहेत.
महिला संख्या अधिक
स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण दिल्यामुळे सभागृहात पुरुष महिलांची संख्या बरोबरीची आहे. नगरसेवकांच्या विषम संख्येमुळे तर महिलांची संख्या पुरुषांच्या संख्येच्या तुलनेने एकने अधिक आहे. परंतु, या २४ टक्क्यांत महिलांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे महिलांच्या कुटुंबाने त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.
बातम्या आणखी आहेत...